जयहिंद कॉलेजच्या कॅन्टीनचे चित्रच बदलून गेले होते. एरव्ही कॉलेजच्या वर्गात असलेल्या बेंचेसनी कॅन्टीनच्या मुख्य जागेत स्थान पटकावले होते. त्या दिवशी त्या बेंचवरचे विद्यार्थी होते अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर, निर्माता रितेश सिधवानी आणि दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा. हे सगळेजण स्वत:ला ‘फुकरे’ म्हणवून घेत होते. फरहान आणि रितेशच्या एक्सेलची निर्मिती असलेल्या ‘फुकरे’ चित्रपटासाठीची ही जमवाजमव होती हे लक्षात असले तरी ‘फुकरे’ म्हणजे काय हे मोठे कोडे उलगडत नव्हते. त्यामुळे माईक हातात घेतल्या घेतल्या पहिल्यांदा फरहानला ‘फुकरे’चा अर्थ स्पष्ट करावा लागला.
‘दिल चाहता है’, ‘रॉकस्टार’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांनंतर फरहान आणि रितेशने ‘फुकरे’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांचे आहे. ‘फु करे’ म्हणजे काहीही न करता नुसतेच टवाळकी करत वेळ घालवणारी माणसे. फु करे हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या आयुष्यातली मी अशीच वाया घालवलेली दोन र्वष आठवतात. मी आणि रितेश तेव्हापासून एकत्र आहोत त्यामुळे आम्ही दोघांनीही ही फुकरेगिरी केली होती. शेवटी आईने रागाने घराबाहेर काढले तेव्हा कुठे फुकरेगिरी संपली, अशी आठवण या वेळी फरहानने सांगितली. ‘फु करे’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या दिवसांचीच ही कथा असणार आहे, असे फरहानने या वेळी स्पष्ट केले. आत्तापर्यंत एक्सेलची निर्मिती असलेल्या प्रत्येक चित्रपटाची कथा ही मित्रांभोवतीच फिरते. त्यामुळे मित्रांच्या गोष्टीच जास्त फरहानला आकर्षित करतात का, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर हा प्रश्न मला कित्येकदा विचारला जातो. त्यापेक्षा तुम्ही त्याच त्याच प्रेमकथा करणाऱ्यांना तुम्ही असे का करता, हा प्रश्न का विचारत नाही, असा उलटा सवाल फरहानने उपस्थित केला. माझ्यासाठी कथेचा विषय आणि त्याची मांडणी महत्त्वाची राहिली आहे. मग ती मित्रांची गोष्ट आहे का, प्रेमाची गोष्ट आहे याचा मी विचार करत बसत नाही, असे त्याने सांगितले. सध्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला फरहान ‘फुकरे’मध्ये दिसणार नाही. चित्रपटातील व्यक्तिरेखांचे वय आणि आपले व्यक्तिमत्त्व यांचाही ताळमेळ बसावा लागतो. त्यामुळे प्रत्येक भूमिका आपणच करणार, असा आग्रह धरून उपयोग नसतो. ‘फु करे’च्या कथेची गरज ही महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांची होती त्यानुसार एकदम चपखल कलाकारांची निवड के ली असल्याचे कौतुकही फरहानने या वेळी केले. या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनज्योत सिंग, अली फजल, रिचा चढ्ढा, दाक्षिणात्य अभिनेत्री विशाखा सिंग आणि प्रिया आनंद यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.