गेल्या वर्षी मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर शासनाने आगीच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
मंत्रालयाच्या इमारतीत सगळीकडे, तसेच परिसरात एकूण सुमारे ९० हायड्रंट्स लावण्यात आले आहेत. जुन्या यंत्रणेऐवजी ‘फुल्ली प्रेशराईज्ड’ हायड्रंट यंत्रणा लावल्याने आग लागल्यास जोरकसपणे पाण्याचा मारा करणे शक्य होईल.
हायड्रंट्स सुरू झाले की ही स्वयंचलित यंत्रणा कार्यरत होईल. याशिवाय प्रत्येक जिन्यात ‘वेट रायझर सिस्टिम’ बसवण्यात आली आहे. आगीनंतर तापमान ६८ अंश सेल्सिअसवर पोहोचले की ‘स्प्रिंक्लर बल्ब’ फुटेल आणि पूर्णपणे प्रेशराईज्ड अशी ‘स्प्रिंक्लर सिस्टिम’ कार्यान्वित होईल. आगीची घटना कधीही घडू शकते, हे लक्षात घेऊन प्रत्येक चौरस फूट क्षेत्रात स्प्रिंक्लर्स बसवण्यात आले आहेत. फॉल्स सिलिंगच्या संरक्षणासाठीही तेथे ‘अपराईट स्प्रिंक्लर सिस्टिम’ बसवण्यात आली आहे. तसेच पंपच्या ठिकाणी ‘फायर अलार्म गाँग’ लावण्यात आले आहेत.
यापूर्वीच्या आगीच्या वेळी झालेली अडचण व धावपळ लक्षात घेऊन, आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी ठेवलेल्या मार्गात कुठल्याही वस्तू साठवून ठेवल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. सव्र्हर रूम, इलेक्ट्रिकल पॅनेल, सिक्युरिटी रूम इ. ठिकाणी ‘गॅस सप्रेशन सिस्टिम’ बसवण्यात आली आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी तब्बल ५ लाख लीटर्स पाण्याचा साठा ठेवण्यात येणार आहे.
आगीच्या घटनेच्या वेळी वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे.