राष्ट्रसोविका समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाचा समारोप
आधुनिकतेला आपला तरुणवर्ग नीट समजू शकला नसून निव्वळ पैसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, विदेशात शिक्षण व अर्थाजन हीच आधुनिकता मानली जाते. परंतु, आचार विचार यात प्रगल्भता राखणे म्हणजे खरी आधुनिकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताक्का यांनी केले.
रामनगरातील श्री शक्तिपीठात राष्ट्र सेविका समितीचे प्रवीण शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या वर्गाचा समारोप झाला. यावेळी प्रमुख वक्तया म्हणून शांताक्का बोलत होत्या. इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे प्रमुख अतिथी  आणि वर्गाच्या सर्वाधिकारी नीमा अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होत्या.
आधुिनकतेच्या विशेषत: पाश्चात्य संस्कृतीच्या मोहजाळामुळे आजची पिढी भरकटत आहे, दिशाहीन झाली आहे. त्यासाठी योग्य दिशा, मार्ग दाखविण्याची आवश्यकता आहे. गुरूकुलाद्वारे पूर्वी ही जबाबदारी पार पाडली जायची. विद्यार्थी देखील आदर्श गुरूसोबत आदर्शवान असायचे, पण आजच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये ही परंपरा दिसत नाही. ज्ञान मिळविण्याची पूर्वीसारखी प्रवृत्ती देखील कमी होत आहे. समितीतर्फे प्रवीण शिक्षावर्गाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवा पिढीत ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात जो भ्रष्टाचार, अनाचार दिसत आहे त्याच्या मुळाशी ज्ञानाचा उपयोग फक्त धन कमविणे हा विचार आहे. यातून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवण्याची गरज आहे. पवित्रता, धैर्य व समर्पणाची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागवावी, असे शांताक्का म्हणाल्या.
यावेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, समितीचा प्रवीण शिक्षावर्ग म्हणजे केवळ स्त्री शक्तीवर संस्कारापुरता नसून तो राष्ट्राच्या पुनर्निर्मितीचा एक यज्ञ आहे. स्वदेशातून स्वधर्म, स्वधर्मातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून स्वाभिमान या चार तत्त्वांवर भारतीय संस्कृती टिकून आहे.
शिक्षावर्गातील कार्याची माहिती वर्गाच्या सर्वाधिकारी नीमा अग्रवाल यांनी दिली. बौद्धिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि नैतिक याविषयांवर सेविकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याची शिकवण देण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला. सेविकांनी सुरुवातीला दंडयोग, घोष, तलवारबाजी आदींची प्रात्यक्षिके सादर केली.