लोकसभा निवडणूक प्रचारासाठी विविध राजकीय पक्ष नवनवीन मार्ग शोधत आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अॅप यासह इतरही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आता मोदी स्टाईल साडय़ा आणि कुर्ता बाजारात विक्रीसाठी आले असून या कपडय़ांना सध्या विदर्भात मोठी मागणी आहे.
सध्या लोकसभा निवडणुकांचा माहोल असून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी संपर्क केला जात असताना आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाने वेगवेगळ्या वस्तू बाजारात विक्रीला आल्या आहेत. विदर्भातील बहुतेक बाजारपेठेत मोदी स्टाईल वस्तूंना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील इतवारी भागात दुकानदारांनी खास मोदींची छायाचित्रे व फलक दुकानाबाहेर लावली आहेत. दुकानांच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या साडय़ांवर मोदी लाओ देश बचाओ असे फलक लावण्यात आले आहेत. नयन, वेनियल किंवा नेहा या नावाच्या साडय़ा घेतल्या की त्यांना मोदींना टाळणे शक्य नाही. कारण ज्यामध्ये साडी दिली जाते त्या डब्यावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. सुरत आणि अहमदाबादमधून येणाऱ्या सर्वच साडी उत्पादकांनी आता आकर्षक मॉडेल्स ऐवजी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरले आहे. हे छायाचित्र महिलांचे लक्ष वेधून घेत आहे.
सध्या युवकांपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोदींची क्रेझ असल्यामुळे त्यांच्या नावाच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. अवघ्या ३०० रुपयात गुजरातची साडी मिळत असल्यामुळे महिला त्या खरेदी करतात.
विशेषत: भाजपच्या महिला आघाडीने डझनाच्या भावाने साडय़ा खरेदी केल्या आहेत. या संदर्भात सेवक हेडाऊ या दुकानदाराला विचारले असता त्यांनी सांगितले, एखादी साडी महिलांच्या पसंतीस उतरविणे हे दुकानदारांसाठी मोठे आव्हान असते.
लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर मोदी साडय़ांची विक्री वाढली आहे. स्वस्तात मस्त असलेली साडी महिलांच्या पसंतीस उतरत असल्यामुळे आणलेला स्टॉक संपण्याच्या मार्गावर आहे. दिवसाला साधारणण: ३० साडय़ांची विक्री केली जात आहे.

प्रचाराला वेग आल्यावर मागणीत वाढ
ठोक व्यापारी राकेश मदान यांनी सांगितले, गुजरातमधील काही मोदी समर्थक साडी उत्पादकांनी सर्वात आधी स्वतचा व्यापार वाढविण्यासाठी हा नवी शक्क्ल शोधून काढली. प्रारंभी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, निवडणुकीत जस जसा रंग भरत गेला आणि मोदी साडीचा प्रचार होताच विक्री वाढली आहे. शहरात खादी ग्राामोद्योग किंवा गारमेंटसच्या दुकानात मोदी शर्टची मागणी वाढली आहे. नागपुरात नुकत्याच झालेल्या हातमाग प्रदर्शनात मोठय़ा प्रमाणात मोदी शर्टला चांगली मागणी होती. उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या स्टॉलवर दहा दिवसात ४०० मोदी कुर्ताची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. कुर्ता आणि साडय़ाच्या माध्यमातून शहर सध्या मोदी फिवर झाले आहे.