मतदारांमध्ये आलेल्या मोदी लाटेने केवळ काँग्रेसच्या आमदारांचीच नाही तर येत्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेकांची पंचाईत करून टाकली आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर या नेत्यांच्या लढण्याच्या इच्छेवरच पाणी फेरले जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा तब्बल २ लाख ३६ हजार मतांनी पराभव केला. मतदारांमध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे भाजपला सर्वच विधानसभा मतदारसंघात निर्णायक आघाडी मिळाली. लोकसभेच्या या निवडणुकीत विधानसभेसाठी इच्छुक असलेले अनेक नेते प्रचारात सक्रिय होते. या सर्वानी आता मोदी लाटेचा धसका घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजुरातील नेते सुदर्शन निमकर आगामी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यावेळी त्यांच्यासमोर कुणाचे काम करावे? असा प्रश्न होता. अखेर निमकरांनी आपचा झाडू हाती धरला. मोदी लाटेत या झाडूचे पार पानिपत झाले. त्यामुळे आता निमकरांची पंचाईत झाली आहे. लोकसभेच्या वेळी भाजपला मदत केली असती तर बरे झाले असते अशी भावना त्यांच्या समर्थकांच्या मनात आहे. चंद्रपूरची जागा राखीव असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक नेते बल्लारपुरातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्यावेळी येथे काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे यावेळी उमेदवारी मिळेल या आशेवर या नेत्यांनी काँग्रेसचा प्रचार केला. यात देवतळे यांचे कट्टर समर्थक सुभाष गौर, नंदू नागरकर, विनोद दत्तात्रय, वडेट्टीवारांचे समर्थक संतोष रावत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेसचे बल्लारपुरातील नेते घनश्याम मुलचंदानी, काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा समावेश होता. आता बल्लारपुरात सुद्धा भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याने या साऱ्या नेत्यांच्या इच्छेवर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
भाजपचे नाना शामकुळे चंद्रपूरचे आमदार आहेत. मूळचे नागपूरचे असलेले शामकुळे फक्त एकदाच लढेन असे सांगत येथे आले. यावेळी या मतदारसंघात भाजपला कमी मताधिक्य मिळाले तर शामकुळे ऐवजी आपला क्रमांक लागेल या आशेवर भाजपमधील अनेकजण होते. यात किशोर जोरगेवार, राजेश मून यांचा समावेश होता. प्रत्यक्षात येथे भाजपला मोठे मताधिक्य मिळाल्याने शामकुळे खुशीत तर हे इच्छुक मात्र दु:खात अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसमधील अनेकजण चंद्रपुरातून लढण्यासाठी इच्छुक होते. यात अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, महेश मेंढे यांचा समावेश आहे. या सर्वाचा आता हिरमोड झाला आहे. संजय देवतळे लोकसभेत गेले तर आपल्याला संधी मिळेल या आशेवर वरोरा भद्रावतीतील अनेकजण होते. यात विजय देवतळे यांचाही समावेश आहे. आता देवतळे पराभूत झाल्याने ते पुन्हा विधानसभा लढतात की नवीन चेहऱ्याला संधी देतात यावर या इच्छुकांचे डोळे लागले आहेत.
चिमूरमध्ये भाजपला आघाडी मिळाल्याने वडेट्टीवारांऐवजी आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले अविनाश वारजूकरसुद्धा मोदी लाटेमुळे इच्छेवर पाणी फेरले जाईल या चिंतेत आहेत. गेल्यावेळी ब्रम्हपुरीतून भरपूर मते घेणारे व यावेळी केवळ उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत गेलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचीही अवस्था अशीच झाली आहे.