भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी बुधवारी देशातील ३०० शहरात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे थेट संपर्क साधणार आहेत. या शहरांमध्ये नगरचाही समावेश असून शहरात माणिक चौक व चितळे रस्ता अशा दोन ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत मोदी देशातील ३०० शहरांमध्ये जनतेशी थेट संपर्क साधणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून सुरूवातीला अर्धा तास मोदी यांचे भाषण आणि नंतर दीड तास जनतेशी थेट प्रश्नोत्तरे असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. नगर शहरात माणिक चौक आणि चितळे रस्त्यावरील चौक अशा दोन ठिकाणी त्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना येथून मोदींशी थेट संवाद साधता येईल. खासदार दिलीप गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असून नागरिकांनीही मोठय़ा संख्येने यात सहभाग घ्यावा असे आवाहन पोटघन यांनी केले आहे.
संघटनेचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन येत्या दि. १६ ला दिल्ली येथे होणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेची ध्येयधोरणे व मोर्चेबांधणी या अधिवेशनात करण्यात येणार आहे. संघटनेच्या जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन पोटघन यांनी केले आहे.