News Flash

मोदींच्या नावाने स्थानिक चमकेश नेत्यांची बॅनरबाजी

गुजरातमध्ये होर्डिग्ज, बॅनर, फलक, भित्तीपत्रके यांना गेली अनेक वर्षे पूर्णपणे पायबंद घालणारे माजी मुख्यमंत्री व भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मात्र

| May 23, 2014 07:24 am

गुजरातमध्ये होर्डिग्ज, बॅनर, फलक, भित्तीपत्रके यांना गेली अनेक वर्षे पूर्णपणे पायबंद घालणारे माजी मुख्यमंत्री व भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मात्र सध्या सर्वत्र महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांनी चांगभलं करून घेण्यास सुरुवात केली असून नवी मुंबईत मोक्याच्या जागा या चमकेश नेत्यांनी व्यापून टाकल्या आहेत. त्यामुळे हे अनधिकृत फलक काढून टाकल्यास जणू काही मोदी यांना काय वाटेल अशा विचारात असणाऱ्या पालिकेने या फलकांवर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे नेरुळमध्ये असाच एक महायुतीचा फलक फाडण्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ वातावरण तंग झाले होते.
लोकसभा निवडणुकींचा १६ मे रोजी निकाल लागल्यानंतर देशात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी स्वत:च्या गल्लीतही कुणी ओळखत नसलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक, होर्डिग्ज, भित्तीपत्रके लावण्याचा धुमधडाका लावला आहे. निकालाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या कोण्या एका दीप भानुशाली नावाच्या कार्यकत्याने संपूर्ण शहरात मोदी यांच्या नावाचा वापर करून स्वत:च्या चमकेशगिरीचे दीप लावले आहेत. केवळ मोदी आणि स्वत:ची छबी प्रसिद्ध करून या महाशयाने नवी मुंबईत आपल्याशिवाय दुसरा भाजपचा कार्यकर्ताच नसल्याचे चित्र निर्माण केले असून महायुतीचे राजन विचारे आपल्यामुळेच निवडून आल्याचा त्याचा आविर्भाव आहे. नवी मुंबईतील ऐरोली, वाशी, सीबीडी, तुर्भे, नेरुळ या भागात हे फलक दिसून येत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने दाखवलेली नाही हे विशेष. नवी मुंबईत फलकांचे दिवे लावणारे हे महाशय लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याचे समजते. शिवसेनेचे युवा नेते वैभव नाईक यांचे हे व्यवसायिक भागीदार असून महायुतीतील दोन प्रमुख पक्ष त्यांनी भागिदारीत वाटून घेतले आहेत. जिवाचे रान करून नवी मुंबईतील मताधिक्य वाढवणारे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे जेवढे फलक नाहीत तेवढे फलक या आर्थिकदृष्टय़ा बलशाली कार्यकर्त्यांने लावले आहेत. त्यामुळे एका रात्रीत या महाशयांचा पोस्टर लीडर म्हणून उदय झाला आहे. अशी प्रवृती नवी मुंबईत बोकाळली असून नजर जाईल तेथे होर्डिग्ज, बॅनर लावले गेल्याचे दिसून येत आहे. यात शिवसेनेचे कार्यकर्तेही मागे नाहीत. त्यांनीही शहरात अशी अनधिकृत होर्डिग्ज लावण्याचा धडाका कायम ठेवला आहे. यातूनच नेरुळ येथे महायुतीचा एक बॅनर फाडल्याची घटना मंगळवारी घडली आहे. महायुतीच्या विजयानंतर पदोपदी दिसणारे राष्ट्रवादीचे बॅनर गायब झाले आहेत पण पराजित उमेदवार संजीव नाईक यांनी मतदारांच्या आभाराचे पांढऱ्यावर काळे केलेले बॅनर सर्वत्र लावले आहेत. त्या बॅनरमधून अपयश दिसून येते. यातील कोणत्याही बॅनरची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ते काढून टाकण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांची होती पण सत्ताधारांच्या पुढे नेहमीच लोटांगण घालणाऱ्या या अधिकाऱ्यांनी हे बॅनर गेली सात दिवस कायम ठेवले आहेत. या बॅनरची परवानगी घेण्याच्या सूचना संबधित पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर विनापरवानगी बॅनर आढळल्यास ते काढून टाकण्यात येतील असे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले. त्यामुळे अनधिकृत बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना परवानगी घेण्यास वेळ देण्याचे सौजन्य पालिकेने दाखविले असल्याचे दिसून येते. असे सौजन्य इतर अनधिकृत बाबतीत दाखविले जाईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात बॅनरबाजीच्या विद्रूपीकरणाला पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष कारणीभूत असून स्वत:च्या पक्षाचे बॅनर दिसल्यास ते तसेच ठेवा आणि विरोधकांचे बॅनर दिसल्यास पहिले आमचे काढा असे फर्मान मुख्यालयातून अधिकाऱ्यांना दिले जात असल्याने त्यांची पंचाईत होते. त्यामुळे शहरात बॅनरसंस्कृती बोकाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 7:24 am

Web Title: modis banner by local leaders
टॅग : Uran
Next Stories
1 तीन वर्षांपासून विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
2 उरणलाही पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस हवा
3 दिवाळीत परिवहन सेवेचे ‘अच्छे दिन’..
Just Now!
X