विदर्भ आणि मराठवाडय़ातील कलावंतांना कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा असताना त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नसल्यामुळे नागपूरच्या नाटय़ शाखेने ते उपलब्ध करून दिले आणि त्यांचे मेळावे आयोजित केले तर परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा ताण आणि खर्च कमी होईल, असे मत नाटय़ परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नागपूर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलावंत मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात मोहन जोशी बोलत होते. वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते विलास उजवणे, महापौर प्रवीण दटके, परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे, कार्यवाह नरेश गडेकर उपस्थित होते.
राज्यातील अनेक जिल्ह्य़ात अनेक चांगले कलावंत आहेत. मात्र, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ात नाटय़ परिषदेच्या शाखा नाही. त्यामुळे नागपूर शाखेने त्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्य़ातील हौशी कलावंतांना सोबत घेऊन त्यांचे मेळावे आयोजित करावे. त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या जेणे करून प्रत्येकवेळी त्यांच्यावर मुंबईला मध्यवर्ती शाखेकडे येण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक जिल्ह्य़ात नाटय़ शाखा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. राज्यात नाटय़ शाखांचा विस्तारासोबत कलावंतांना व्यासपीठ कसे उपलब्ध केले जाईल यादृष्टीने परिषदेने विचार करावा. झाडीपट्टी रंगभूमी वाढली आहे. त्यामुळे त्या भागातील कलावंतांना संधी मिळेल. नागपुरात चांगला प्रेक्षक वर्ग, कलावंत आणि पर्यटनस्थळे आहे. त्यामुळे मुंबईसारखीच नागपूर चित्रपटनगरी होऊ शकते. त्यादृष्टीने नाटय़ परिषदेने प्रयत्न करावे, असेही जोशी म्हणाले.
डॉ. विलास उजवणे म्हणाले, नागपूरच्या नाटय़ शाखेशी सुरुवातीपासून जुळलो असल्यामुळे मधल्या काळात परिषदेला अनेक संकटाचा सामना करावा लागला. मात्र, त्यातही काही पदाधिकाऱ्यांनी काम सुरू ठेवले. ज्या पद्धतीने नाटय़ शाखेचा विस्तार अपेक्षित होता तो करण्यात आपण सगळे कमी पडलो आहोत. सगळ्यांची साथ मिळाली तर शाखेचा विस्तार होऊ शकतो. नागपुरात चित्रपटसृष्टी वाढावी यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. चित्रपट महामंडळाची शाखा नागपुरात सुरू झाली पाहिजे. त्यादृष्टीने नाटय़ परिषदेने पुढाकार घेतला तर येथील कलावंतांना मोठय़ा पडद्यावर संधी मिळायला फार वेळ लागणार नाही, असेही उजवणे म्हणाले.
गिरीश गांधी म्हणाले, निष्ठेने काम करणारे अनेक कलावंत आहे. मात्र, काही कलावंत मध्यवर्ती शाखेमध्ये आपल्या कलावंतांच्या तक्रारी करीत असल्यामुळे काम करणाऱ्यांचा निरुत्साह होतो. दुर्देवाने अशा काही घटना मधल्या काळात घडल्या आहेत. अतिशय विपरीत परिस्थितीत काही कलावंत काम करीत असताना त्यांचा उत्साह कमी करण्याचे काम कलावंतांनी करू नये, अशी सूचना गांधी यांनी केली. महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी परिषदेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल फरकसे यांनी तर संचालन प्रभा देऊस्कर यांनी केले.