लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदास चंद्रकांत खैरे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी वेरुळ येथे जाऊन रविवारी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. गेल्या लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराजांना एक लाख ४३ हजार मते मिळाली होती. या महाराजांना राजकारणात बळकटी दिल्यास काँग्रेसचा विजय सुकर होऊ शकतो, असे विश्लेषण करणाऱ्या काही निवडक कार्यकर्त्यांनी ही भेट घडवून आणली. भेटी दरम्यान झालेल्या राजकीय चच्रेचा तपशील कळू शकला नाही. मात्र या भेटीमुळे लोकसभा मतदारसंघातील आकडेमोडीला नव्याने सुरुवात झाली आहे.
 शांतिगिरी महाराज व मोहन प्रकाश यांच्या भेटी दरम्यान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती होती. या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असून लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराजांनी काँग्रेसला मदत करावी, अशी विनंती या निमित्ताने करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ५५ हजार ५३८ मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंग पवार यांचा ३२ हजार ६९१ मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या उमेदवाराची मते कमी व्हावीत म्हणून काँग्रेसने शांतिगिरी महाराजांना बळ दिले होते. निवडणुकीनंतर राजकीय पटलावर या महाराजांची चर्चा नव्हती. मात्र, मोहन प्रकाश यांच्या भेटीमुळे ते पुन्हा चच्रेत आले आहेत.
 या भेटीला औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचीही किनार आहे. १९ ऑगस्ट रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवार निवडीपूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत आपले काम भरावे, म्हणूनही काही कार्यकत्रे प्रयत्न करत आहेत. आजच काही जणांनी उमेदवारीच्या दाव्यासाठी लागणारे प्रगती अहवाल, पक्षासाठी केलेल्या कामाचा गोषवाराही आवर्जून सादर केला.
 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रभारी आणि पराभूत तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराची ही भेट राजकीय अभ्यासकांना भुवया उंचवायला लावणारी आहे. दुपारी झालेल्या या भेटीबाबत काँग्रेसकडून अधिकृत कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने बोलताना खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, की शांतिगिरी महाराज निवडणुकीत पराभूत झाल्यापासून त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. खरे तर मी देखील त्यांना मानतो. त्यांनी धर्मकारण करावे. आता पुन्हा काँग्रेसला सहकार्य करून त्यांनी स्वतचे हसे करून घेऊ नये.