दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका मारहाणीतून मोहनीशला जमावाने संपविल्याची ग्रामीण पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मोहनीशला संपविण्यासाठी जमाव गोळा होतो, यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची पोलिसांना दाट शंका आहे.
कन्हानच्या सतरापूर वस्तीत राहणारा मोहनीश रेड्डी काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या युवक शाखेचा कन्हान शहर अध्यक्ष होता. सध्या तो जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होता. घटनास्थळी उपलब्ध माहितीनुसार, यापूर्वी मात्र त्याच्यावर खंडणी मागणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण आदी गुन्हे कन्हान पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मारहाण, लुटमार आदी गुन्ह्य़ातून त्याने त्याची कन्हान परिसरात दहशत निर्माण केली. राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-कोलकाता रेल्वे मार्गावरील कन्हान हे महत्त्वाचे ठिकाण असून या परिसरात असलेल्या कोळसा खाणींमुळे गुन्हे जगतातही या ठिकाणाला महत्त्व आले. कोळसा तस्करीतून गुंडगिरीही फोफावली. अशा कन्हानमधील गुन्हे जगतावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला आहे. मोहनीशचाही तसाच प्रयत्न असल्याचे लोक सांगतात.
मोहनीशच्या त्रासाने अनेक लोक कंटाळले होते. सध्या तो भूखंड व्यावसायिक असला तरी त्याच्या बळावर मात्र त्याच्या सोबत्यांची गुंडगिरी फोफावली होती. त्यामुळे त्याच्या नावाची दहशत वाढली होती, असे लोक सांगतात. मोहनीशला प्रतिस्पर्धीही वाढले होते. २०१२ व २०१३ मध्ये दोन वेळा त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्यातून तो बचावला. दोन दिवसांपूर्वी मोहनीशचा एक साथीदार सतरापूरमधून जात होता. दुचाकी ठेवण्यावरून त्याचे सतरापूर वस्तीत राहणाऱ्या एका तरुणासोबत भांडण आणि मारामारी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तेव्हा दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. त्यातून आजची घटना घडली, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी मोहनीशने या वस्तीत जाऊन दमदाटी केली होती. मोहनीशच्या साथीदारावर का कारवाई केली नाही, असा या वस्तीतील विशिष्ट समुदायातील लोकांचा राग होता. याप्रकरणी त्यांची बैठकही झाल्याचे लोक सांगतात. काही वर्षांपूर्वी मोहनीशला हद्दपार करण्याचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी पाठविला होता. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. नागरिकांना त्रास देणाऱ्यास राजकीय अभय मिळत असल्याचीही लोकांमध्ये राग होता. त्याच्या गुंडगिरीने त्रासल्याने आजची घटना घडली असल्याचाही लोकांचा कयास आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून ही घटना घडल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. तरीही मोठय़ा संख्येत जमाव मोहनीशच्या घरावर चालून जातो, त्यात महिला व मुलांचाही समावेश असतो, त्यांच्या हातात इतर शस्त्रे असतात, या बाबी पोलिसांच्या दृष्टीने शंकेच्या ठरल्या आहेत. गेल्या काही वर्षांत जमावाकरवी गुंडाच्या हत्येची ही सातवी घटना आहे. १९९८ मध्ये नागपुरातील वैशाली नगरात गफ्फार डॉन या गुंडाची जमावाने हत्या केली. २००४ मध्ये अक्कू यादव तर २०१२ मध्ये महाराजबागेजवळ इक्बाल शेख या गुंडाची जमावाने हत्या केली.