‘मालेगाव का सुपरमॅन’, ‘मालेगाव के शोले’, ‘मालेगाव का करण अर्जुन’, ‘मालेगाव का गजनी’ अशी नावे ऐकली तर कुतूहल जागे व्हावे, एवढी ओळख मालेगावात तयार झालेल्या या  छोटेखानी बजेटमधील चित्रपटांनी नक्कीच बनवली आहे. या चित्रपटांचे कौतुक झाले. पण, एखाद्या चित्रपट उद्योगाप्रमाणे त्यांचे हे प्रयत्न विस्तारले नाहीत. आत्ता मात्र आपल्या या हौसेला जाणीवपूर्वक व्यवसाय म्हणून वाढवण्याचा निर्धार मालेगावातील चित्रपटकर्मीनी केला असून ‘मालेगाव में गडबड घोटाला’ हा चित्रपट पहिल्यांदाच युएफओद्वारे एकाचवेळी देशभर प्रदर्शित केला जाणार आहे.
‘मालेगावात यापूर्वी आम्ही जे चित्रपट करत होतो ते हौसेपोटी. एकमेकांची मदत घेऊन पाच ते सहा लाख गोळा करायचे. कोणीतरी एकाने कथा लिहायची. मग स्थानिक कलाकारांना घेऊन चित्रपट बनवायचे. ते इथल्याच थिएटर्समध्ये प्रदर्शित करायचे असे काम आम्ही करत होतो. त्यातून एक ते दोन लाखांचा गल्ला जमायचा. उरलेल्या तीन-चार लाखांचे काय, मग स्थानिक केबलवाल्यांना सॅटेलाईट हक्क विकून काही पैसे यायचे. पण, हौशीच्या या जमाखर्चात नुकसानच जास्त होते,’ अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक अन्वर शेख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असला तरी मालेगावापुरतीच चित्रपटाची ओळख राहू नये, यासाठी मालेगावातीलच इरफान शेख, आलिम शेख यांच्यासह ए टु झी बॅनरखाली ‘मालेगाव मे गडबड घोटाला’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. यात हेमंत बिर्जे या हिंदीतील कलाकारासह मालेगावचा प्रसिध्द अभिनेता आसिफ अलबेला, चित्रपटाचे सहनिर्माते एस. नझीम यांच्या मुख्य भूमिका आहेत. २५ लाख रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा मालेगावातील पहिला बिग बजेट चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा यासाठी चार महिने आपण भटकत होतो. पण, इतक्या छोटय़ा बजेटचे चित्रपट आम्ही प्रदर्शित करत नाही, असे सांगून वितरकांनी वाटेला लावले, असे अन्वर यांनी सांगितले. अखेर मॅक एंटरप्रायझेस या चित्रपट वितरण कंपनीने रस घेतला.