पालिका अधिकाऱ्यांची डोळेझाक     
डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून काही खासगी सावकार रेल्वे स्थानक भागातील निवासी सदनिका घरमालकाकडून खरेदी करून त्यांचा व्यवसायासाठी वापर करीत असल्याची माहिती उघडकीला आली आहे. सावकारांच्या या कृतीला काही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली पण त्यांना दहशतीच्या बळावर झिडकारण्यात आल्याचे सांगण्यात येते.
डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड, रामनगर परिसरात हे गैरप्रकार गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. अनेक जाणकार नागरिक याविषयी खासगीत बोलत आहेत. सावकारांच्या दहशतीला घाबरून कुणीही उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानक परिसरातील जागांना आता सोन्याहून अधिक मोल आले आहे. रेल्वे स्थानक भागातील काही इमारतींमधील रहिवासी बाजारपेठ, वाहतुकीची वर्दळ या सततच्या गोंगाटाला कंटाळून आणि सदनिकांना चांगला भाव मिळत असल्याने विकत आहेत.
या विक्री व्यवहाराची थोडी कुणकुण लागली की काही सावकार मंडळी ही या घर विक्री करणाऱ्या मालकाला भेटण्यासाठी आपल्या दलालांना पाठवितात. त्याला त्याच्या मनाप्रमाणे दर देऊन संबंधित सदनिका खरेदी करतात. एकदा विक्री व्यवहार पूर्ण झाला की मग त्या सदनिकेची सोसायटीची परवानगी न घेता आतमधील सर्व भिंती पाडून तेथे प्रशस्त हॉल किंवा व्यापारी गाळे काढले जातात. तेथे कार्यालय किंवा व्यवसाय सुरू केला जातो. या सर्व प्रक्रियेला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली तर त्यांना दमदाटी करून गप्प बसविले जाते, असे सांगण्यात येते.  पूर्व भागातील सावरकर रस्ता, रामनगर, बाजारपेठ विभागात या सावकारांनी अनेक मोक्याच्या निवासी जागा खरेदी करून तेथे व्यापारी दुकाने थाटली असल्याचे सांगण्यात येते. या सर्व गोष्टी अनधिकृत असूनही पालिकेच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागातील कर्मचाऱ्यांना याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे समजते. कर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, निवासी सदनिकांचा व्यापारी वापर सुरू असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई आणि दुप्पट दंडवसुलीची कारवाई केली जाते. डोंबिवलीत हा प्रकार खूप असल्याचे हा अधिकारी म्हणाला. पोलीस ठाण्यात तक्रार केली तर आपल्या कुटुंबीयांना त्रास होईल या भीतीने सोसायटीचे पदाधिकारी पुढे येण्यास तयार नसल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते.