बँकेच्या लॉकरचे कुलूप तब्बल दीड वर्षे उघडे राहिले. पण, त्यातील ऐवजाला धक्का लागला नाही. अर्बन बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. कर्मचारी व अधिकारी यांच्या दक्षतेने सुमारे पाच लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने सुरक्षित असल्याचे दीड वर्षांने आढळून आले. पुणे येथील शशिकांत कानबा पांढरे यांनी अर्बन बँकेच्या येथील शाखेत लॉकरची सुविधा घेतली. लॉकर घेताना मेव्हणे सुधीर बोरावके यांचा पत्ता दिला. दीड वर्षांपूर्वी त्यांनी लॉकरमध्ये दागिने ठेवले होते. पण, चुकून लॉकरचे कुलूप अर्धवट उघडे राहिले. दोन दिवसांपूर्वी बँकेतील शिपाई शिवाजी घोरपडे हे बँकेची कागदपत्रे व स्टेशनरी ठेवण्यासाठी सुरक्षा गृहात गेले असता त्यांना लॉकर उघडा दिसून आला. त्यांनी शाखाधिकारी एम. ई. पटेकर व अधिकारी प्रदीप बंब यांना ही माहिती दिली. त्यांनी लॉकरची पाहणी केली असता कुलूप उघडे असलेले दिसले. त्यानंतर ग्राहक पांढरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आज पांढरे, बोरावके हे बँकेत आले. संचालक दीपक दुग्गड, संजय छल्लारे, शाखाधिकारी पटेकर, बंब यांच्या उपस्थितीत लॉकर उघडण्यात आला. लॉकरचे कुलूप उघडेच होते. पण, लॉकरमधील ऐवज मात्र सुरक्षित होता. पांढरे यांनी ७ एप्रिल २०११ रोजी लॉकरमध्ये दागिने ठेवले होते. ते सुरक्षित मिळाल्याचे सांगत पांढरे यांनी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अर्बन बँकेच्या ग्राहकांना एक सुखद अनुभव आला.