घाटकोपरमधील फलाटावरील अपघातात हात गमाविलेल्या मोनिका मोरेला ठाण्यातील सेंट झेविअर्स शाळेच्या प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला आहे. प्रत्येक वर्गामध्ये मोनिकाच्या अपघाताची बातमी वाचून दाखवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना  मदतीचे अवाहन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून ७५ हजार रुपये संकलित केले. संस्थाचालकांनीही त्यात तितकीच भर टाकून दीड लाख लाखांची मदत मोनिकाच्या पालकांकडे नुकतीच सुपूर्द करण्यात आली.
मोनिकाच्या अपघातानंतर सुरुवातीला रेल्वेनेही मदतीचा हात आखडता घेऊन अपघातास फक्त मोनिकाच जबाबदार असल्याचा कांगावा केला होता. त्यावेळी येथील सेंट झेविअर्स इंग्रजी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या संस्थेचे संचालक पी. आर. राय यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मोनिकाला मदत करण्याची कल्पना शाळेतील शिक्षकांसमोर मांडली. शिक्षकांनीही त्यास प्रतिसाद दिला. २१ जानेवारी रोजी शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये शिक्षकांनी मोनिकाच्या अपघाताची बातमी वाचून दाखवली.  शाळेच्या नोटीस बोर्डवर मदतीचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत दहा रुपये ते पाचशे रुपयांपर्यंतची मदत देऊ केली.   २१ ते २५ जानेवारी या अवघ्या पाच दिवसांमध्ये ७५ हजारांची रक्कम जमा केली. शाळा प्रशासनानेही तितकीच रक्कम दिली. अशा प्रकारे १ लाख  ५० हजार रुपयांचा धनादेश शाळेच्या प्राचार्या जान्हवी राय-कोटियन आणि अन्य शिक्षकांनी ३० जानेवारी रोजी के.ई.एम.रुग्णालयात मोनिकाची भेट घेऊन तिच्या पालकांकडे सुपूर्द केला.