मोनोरेलच्या प्रवासी सेवेची वेळ मंगळवारपासून सहा तासांनी वाढवण्यात आल्यानंतरही त्याचा कसलाही परिणाम प्रवासी संख्या वाढण्यात झालेला नाही. मोनोच्या सेवेची वेळ सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत केल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी एकूण १५ हजार १६ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती पुढे आली. पहिल्या महिन्यात रोज सरासरी १९ हजार प्रवासी रोज प्रवास करत असताना आता ती संख्या फेऱ्या वाढवूनही मोनोकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.
चेंबूर ते वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेल २ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. उंचावरून धावणाऱ्या या रंगीबेरंगी आणि वातानुकूलित गाडीतून प्रवासाची गंमत अनुभवण्यासाठीच मोनोरेलमध्ये लोकांनी प्रवास केला. ती सार्वजनिक वाहतुकीचे साधन झालीच नाही. मोनोरेलची क्षमता आणि तिच्या फेऱ्यांचे गणित तपासले तर मोनोरेल क्षमतेच्या निम्म्याहून अधिक रिकामीच धावत असल्याचे चित्र होते. दररोज मोनोवरचा खर्च सात लाख रुपये..उत्पन्न मात्र अवघे दोन लाख रुपये आणि तोटा पाच लाख रुपये अशी अवस्था मार्च अखेर होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा विचार करता सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांचा फटका ‘एमएमआरडीए’ला मोनोरेलपोटी बसला.
या पाश्र्वभूमीवर १५ एप्रिलपासून मोनोरेलची सेवा वाढवण्यात आली. आतापर्यंत सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत धावणारी मोनो आता सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत धावत आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक ५३२९ प्रवासी चेंबूरहून बसले. तर वडाळा स्थानकावरून ३६३६ प्रवाशांनी प्रवास केला. एकूण १५ हजार १६ प्रवाशांनी प्रवास केल्यानंतर एक लाख ३२ हजार ३६८ रुपयांचे उत्पन्न मोनोरेलला मिळाले. म्हणजेच मोनोची सेवा सहा तासांनी वाढूनही प्रवासी संख्या सरासरी चार हजार प्रवाशांनी घटली तर उत्पन्न सुमारे ७० हजार रुपयांनी घटल्याचे चित्र आहे.
सध्या उन्हाळय़ाच्या सुटय़ा सुरू झाल्याने अनेक मुंबईकर शहराबाहेर गेले आहेत. त्यामुळे बहुधा प्रवासी संख्या कमी झाली असावी, अशी सारवासारव ‘एमएमआरडीए’चे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी केली.