देशहितासाठी बलिदान देणाऱ्यांचे कार्य समाजासमोर येण्यासाठी स्मारके होणे गरजेचे असून, स्मारकांच्या माध्यमातून स्फुल्लिंग चेतविण्याचे कार्य घडणार आहे. यादृष्टीने उपक्रम राबविण्याचे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
पंचवटीतील स्वामीनारायण नगरात महापालिकेतर्फे प्रभाग क्र. ११ मध्ये उभारण्यात आलेले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सावरकरांच्या जयंतीदिनी सर्वासाठी खुले करण्यात आले. त्याप्रसंगी गोविलकर बोलत होते. सावरकरांचे योगदान मोठे असून त्यांचे स्मारक ठिकठिकाणी असावे, अशी अपेक्षाही डॉ. गोविलकर यांनी व्यक्त केली. प्रत्येक जण विकास केल्याचे सांगतो, परंतु तो भौतिक विकास असून त्यापलीकडे जाऊन बौद्धिक व मानसिक विकास करणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. प्रभागाचे नगरसेवक बाळासाहेब सानप यांनी यासारखे स्मारक उभारून समाजाचा मानदंड असणाऱ्यांचे जीवनचरित्र सर्वासमोर आणण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या स्मारकाचे दर्शन नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला घडावे या दृष्टीने विविध उपक्रम व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात नगरसेवक बाळासाहेब सानप यांनी हे स्मारक उभारताना अनेक अडथळ्यांमधून जावे लागल्याचे नमूद केले. कार्यक्रमास उपमहापौर सतीश कुलकर्णी, रमेश गायधनी, ज्येष्ठ नेते विजय साने आदी उपस्थित होते. स्वागत नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांनी, तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके यांनी केले. आभार विनोद गोसावी यांनी मानले.