देशाची आर्थिक व राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शेजारीच असलेल्या उरण ते मुंबई या  ६० किलो मीटरच्या रस्त्याच्या मार्गासाठी दोन तासांचे अंतर कापण्यासाठी ५५ रुपये मोजावे लागतात. मोरा ते मुंबई या अध्र्या ते पाऊण तासांच्या जलवाहतुकीच्या प्रवासासाठी ३५ रुपये मोजावे लागतात. रस्त्याच्या प्रवासात वाहतूक कोंडी व प्रदूषणामुळे त्रस्त होणारे या मार्गावरील प्रवासी जलद तसेच प्रदूषण व वाहतूक कोंडीमुक्त, कमी खर्चाचा मार्ग म्हणून मोरा ते मुंबई लाँच सेवेचा जलप्रवास करणे पसंत करतात. मात्र मेरिटाइम बोर्डाने डिझेलची दरवाढ तसेच पावसाळ्यातील प्रवाशांची घटती संख्या याचे कारण पुढे करून या जलप्रवासासाठीच्या तिकीटदरात दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता ३५ ऐवजी ४५ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ जूनपासून लागू होणार असल्याची माहिती मोरा येथील बंदर विभागाचे अधिकारी नितीन कोळी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.    
ब्रिटिश काळापासून उरणमधील मोरा ते मुंबईच्या भाऊच्या धक्क्य़ादरम्यान अर्धा ते पाऊण तासात लाँचच्या मार्गे पोहचण्याची व्यवस्था आहे. सध्या ही जलप्रवासाची योजना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या देखरेखीखाली चालविली जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून या स्वस्त व आनंददायी प्रवासात सुधारणा करण्याचे सोडाच मात्र या मार्गावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. यात जेटीवरील मच्छीमार जाळांचे अडथळे,रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधाराचा होणारा त्रास,प्रवाशांच्या वाहनांसाठी वाहनतळाची कमतरता,स्वच्छतेसाठी स्वच्छतागृहांची अपुरी संख्या तर पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच्या जुन्या लाँचेस व त्यामुळे वारंवार होणारे अपघात यामुळे हा जलप्रवास अवघड बनू लागला आहे.
अलिबाग ते मुंबई जलवाहतूक बंद
वादळीवारे व पासाळ्यातील धोकादायक जल प्रवास टाळण्यासाठी १ जून पासून मुंबई ते अलिबागदरम्यानचे रेवस ते मुंबई तसेच अलिबागमधील मांडवा ते मुंबई दरम्यानची जल प्रवास सेवा चार महिन्यांसाठी बंद करण्यात येते. यावर्षी रेवस ते मुंबईची प्रवास सेवा यापूर्वीच बंद करण्यात आलेली आहे. मात्र पावसाळ्यात बारमाही उरण ते मुंबई ही जलसेवा सुरू असते. ही जलसेवा पावसाळ्यातील वातावरणावरही अवलंबून असते,धोक्याच्या इशाऱ्याच्या वेळी पावसाळ्यात कधी कधी सलग दोन ते तीन वेळा ही सेवा बंद ठेवावी लागते.
दररोज एक हजार प्रवासी वाहतूक करणारी सेवा
 जलमार्गाने दररोज एक हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र सध्या यात घट होत आहे. कारण उरण ते नवी मुंबईला जोडणारी नवी मुंबई महानगरपालिकेने एनएमएमटीची सुरू असलेली बससेवा. दुसरे, पावसाळ्यात हा प्रवास धोकादायक असल्याने उरण-मोरा या जलसेवेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली असल्याची माहिती बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.