त्र्यंबकेश्वर हरित लवादाकडे प्रलंबित असलेल्या  विषयात चुकीची माहिती दिल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांविरुद्ध खोटी तक्रार देऊन त्र्यंबकेश्वर नगरीला बदनाम करणाऱ्या माजी नगरसेविका ललिता शिंदे यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचे देवस्थानचे विश्वस्तपद रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी संतप्त नागरिकांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. हरित लवादाकडे प्रलंबित असलेल्या या विषयात शिंदे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केला.
मनसेचे नगरसेवक काणव व अपक्ष धनंजय तुंगार यांच्याविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या तक्रारीचे पडसाद मोर्चाच्या माध्यमातून उमटले. त्र्यंबकेश्वर शहरातील गोदावरी मोकळी करावी यासाठी माजी नगरसेविका ललिता शिंदे यांनी हरित लवादाकडे दाद मागितली आहे, परंतु त्यांच्या कालावधीत नदीवर स्लॅब टाकला गेला. त्यावेळी त्यांनी विरोध न करता उलट सर्वतोपरी या कामासाठी मदत केली आणि त्यानंतर दोन वेळा निवडणुकीत पराभव झाल्याने काही स्थानिक बडय़ा हस्तींच्या माध्यमातून रोजंदारी करणारे व मेनरोडवरच्या नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने हे उद्योग केल्याची तक्रार मोर्चेकऱ्यांनी केली. नगराध्यक्षा यशोदा अडसरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांमार्फत मोर्चा काढण्यात आला. त्यात भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार काशिनाथ मेंगाळ,
भाजी मंडईतील विक्रेते यांच्यासह गोदावरी स्लॅबवरील व्यावसायिक तसेच महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
त्र्यंबकेश्वर हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून त्याची सर्व जगभर ख्याती आहे. त्याबाबत सर्वानाच आस्था असताना स्वत:च्या स्वार्थासाठी काही व्यक्तींना अगदी कुंभमेळ्याच्या तोंडावर गोदावरीचा कळवळा कसा आला, पालिकेत पदावर असताना यातील छोटी-छोटी ठेकेदाराची कामे स्वत: पदरात पाडणाऱ्यांना एकदम सगळीच भूमी अपवित्र कशी वाटू लागली, असाही सूर मोर्चेकऱ्यांनी लावला. मुळात हरित लवादाकडे ही बाब प्रविष्ट असताना शासकीय अधिकारी-पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन आणि प्रसिद्धीचा  खटाटोप स्थानिकांना रोजचा मन:स्ताप ठरला आहे. या नदीच्या स्वच्छतेची कणव असल्यास शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा देऊन स्वच्छतेचे काम केल्यास हे प्रश्न निर्माण होणार नाहीत, असा सल्ला काही मोर्चेकऱ्यांनी दिला.