विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स असोसिएशनने काढलेल्या मोर्चाप्रसंगी मोर्चेकऱ्यांनी अचानक रस्त्यात ठिय्या दिल्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी असे काही घडेल याची कल्पना नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी वाहनाची तजवीज केली नव्हती. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेव्हा आंदोलकांनी ठिय्या दिला, तेव्हा वाहनाची उपलब्धता करण्यापासून धावपळ करावी लागली. पोलिसांचे एकच वाहन आल्याने आणि त्यातही काही तांत्रिक दोष उद्भवल्याने आंदोलकांना रस्त्यावरून हटविताना यंत्रणेची दमछाक झाली.
साधारणत: अर्धा तास चाललेल्या कसरतीमुळे मेहेर सिग्नल ते सीबीएस मार्गावरील वाहतुकीचा बोजबारा उडाला.
इपीएफ पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी जिल्हा इपीएफ फेडरेशनने मोर्चाचे आयोजन केले होते. फेडरेशनचे संस्थापक राजू देसले, सुधाकर गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात शेकडो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. इपीएफ ९५ अंतर्गत निवृत्ती वेतन अतिशय तुटपुंजे मिळते. औद्योगिक क्षेत्र, महामंडळ, नागरी व सहकारी सेवा अशा एकूण १८६ आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या ४०० ते दोन हजार रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन मिळते. या संदर्भात नेमलेल्या खा. कोशियारी समितीने हे निवृत्तीवेतन किमान तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली आहे. तसेच दरमहा महागाई भत्ता असावा अशा काही सुधारणा करण्यास सुचविले आहे. महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर करताना त्यांची वयोमर्यादा ६५ केली. परिणामी, ६० वर्षांपुढील ज्येष्ठ सोयी-सुविधांपासून वंचित झाले. खा. कोशियारी समितीच्या अहवालावर त्वरित कार्यवाही करावी, किमान साडे सात हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे, या प्रश्नावर तज्ज्ञ समितीचा अहवाल रद्द करावा, एकतर्फी कमी केलेले हक्क परत करावे आणि त्याचा फरक द्यावा, अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथील रस्त्यावर मोर्चेकऱ्यांनी अचानक ठाण मांडले. मोर्चेकऱ्यांची संख्या मोठी असल्याने तुरळक पोलिसांना त्यांना बाजुला हटविता आले नाही. पोलीस वाहन नसल्याने त्यांना ताब्यातही घेता आले नाही. या मार्गावरील वाहतूक कोलमडून पडल्याने मग पोलीस वाहन मागवून घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या मोर्चेकऱ्यांना या वाहनातून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. उर्वरित मोर्चेकऱ्यांना घेण्यासाठी हे वाहन पुन्हा आंदोलनस्थळी आले. परंतु, तेव्हा त्यात तांत्रिक बिघाड झाला. काही काळ ते सुरू होऊ शकले नाही. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास बराच कालापव्यय झाल्याची ओरड वाहनधारकांनी केली.