हिंगणा तालुक्यातील पंचशीलनगर व इसासनी येथील झोपडपट्टीवासीयांना वनविभागाने अतिक्रमण हटविण्याबाबत जारी केलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीसह शेकडो झोपडपट्टीवासीयांनी सोमवारी झिरो माईल्स येथील कार्यालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष व मनपातील गटनेते प्रकाश गजभिये यांनी केले. अनेक वर्षांपासून पंचशीलनगर व भीमनगर झोपडपट्टी झुडपीजंगलाच्या जमिनीवर वसली असून सर्व झोपडपट्टीसासीयाकडे मतदान व आधार कार्ड आहे. शिवाय भीमनगर झोपडपट्टीत विजेची सुविधा पुरविण्यात आली आहे. एवढे असूनही झोपडपट्टी हयविण्याचा प्रयत्न वारंवार वनविभाग करत आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांनी हिंगणा येथील वनविभागाचे कार्यालय व तहसील कार्यालयावर गेल्यावर्षी मोठा मोर्चा काढला होता. तेव्हा झोपडपट्टीवासीयांना कायम करण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार पोटे यांनी दिले होते. त्यानंतर आपली कारवाई वनविभागाने मागे घेतली, पण झोपडपट्टीवासीयांना पुन्हा वन विभागाने नोटीस जारी केल्या. त्या नोटिसच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
 दरम्यान, वन विभागाचे वनसंरक्षक शेषराव पाटील यांची भेट घेऊन  शिष्टमंडळाने नोटीस मागे घेण्याची मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झोपडपट्टीवासीयाांचा मोर्चा वळवून निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांनाही निवेदन देण्यात आले. सुरेश काळबांडे, सोपान गौसाळे, दुर्योधन इंगोले, नीलेश बागडे कपूरचंद गौतम, विशाल पटरे यांच्यासह शेकडो झोपडपट्टीवासीय सहभागी झाले होते.