25 September 2020

News Flash

अधिवेशनावर सावट मोर्चाचेच..

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त व्हीव्हीआयपी तसेच राजकीय पुढाऱ्यांची मांदियाळी असली तरी अधिवेशनावर मंगळवारी केवळ मोर्चाचेच सावट होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले तरी सदस्यांच्या तोंडी केवळ

| December 12, 2012 01:42 am

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त व्हीव्हीआयपी तसेच राजकीय पुढाऱ्यांची मांदियाळी असली तरी अधिवेशनावर मंगळवारी केवळ मोर्चाचेच सावट होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले तरी सदस्यांच्या तोंडी केवळ मोर्चा हाच विषय होता. त्याला सत्तारूढ सदस्यही अपवाद नव्हते.
कापसाला सहा हजार रुपये, धानाला अडीच हजार रुपये व सोयबीनला चार हजार रुपये भाव मिळावा, अनुदानात बारा गॅस सिलिंडर, सिंचन घोटाळ्याची एसआयटीद्वारे चौकशी व इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाने आज मोर्चाचे आयोजन केले होते. विधानभवनाला घेराव घालणार असल्याचेही जाहीर केले. त्यामुळे शासन व सुरक्षा यंत्रणेचीही धावपळ सुरू होती. काल दुपारपासूनच मोर्चावर यंत्रणेचे लक्ष होते. किती लोक आले, याची दर तासाने माहिती घेतली जात होती. काल भारतीय जनता पक्षाच्या विविध नेते व आमदारांकडून वारंवार त्यासंबंधी माहिती घेतली जात होती. विशिष्ट लोकांना ताब्यात घेण्याचीही पोलिसांची तयारी झाली होती. तशी कुणकुण लागताच थेट वरिष्ठांनाच ‘असे करू नका, आणखी चिघळेल’ अशी जाणीव करून दिल्याची अनधिकृत माहिती आहे.
विधानभवनात आंदोलक घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सकाळपासून चौकस होती. विद्यापीठ, आकाशवाणी चौक, महापालिका, रिझव्‍‌र्ह बँक चौक, वन कार्यालय आदी चौरही चौकांकडून रस्ते अधिवेशन काळात बंदच असतात. मात्र, मोर्चाची पोलिसांनी जबरदस्त धास्ती घेतली असल्याचे चित्र होते. या चौकापासून कुणालाही आत जाऊ दिले नव्हते. विधानभोवतालचे रस्ते पासधारकांशिवाय इतरांसाठी बंद होते. पासचीसुद्धा बारकाईने तपासणी केली जात होती.
या चारही बाजूंना दर पावलांवर पोलीस तैनात होते. विधान भवनाच्या संरक्षण भिंतीबाहेरही चौफेर पोलिसांचे कडे आधीपासूनच आहे. गुप्तचरांचे शहरभर जाळे विणण्यात आले. मात्र, त्यांना कालपासूनच अधिक दक्ष राहण्याचे आदेश दिले गेले होते.
विधानभवनाच्या आतही वातावरणावर मोर्चाचे सावट होते. भाजपचा आमदार दिसला की ‘अरे मोर्चात गेले नाही का’, असा सवाल केला जात होता.
भाजपचा एकही सदस्य त्याला अपवाद नसेल. सदनातही सदस्यांच्या तोंडी ‘मोर्चा’ हाच विषय होता. विरोधी पक्ष कामकाजातील विषयावर गदारोळ करीत असताना सत्तारूढ सदस्य ही मोर्चात जा, असे खुणावत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास भाजपचे आमदार मोर्चासाठी निघाले. तेव्हा विधान भवनातील पोलीस किंचित ‘रिलॅक्स’ झाले. मात्र, मोर्चाचे सावट रात्री उशिरापर्यंत कायम होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 1:42 am

Web Title: morcha fearness on winter session of parliament
टॅग Morcha
Next Stories
1 आंतरराज्य निम्न पनगंगा प्रकल्पाचे भिजत घोंगडे
2 भस्मीकरण यंत्र बंद, जैव-वैद्यकीय प्रदूषणात वाढ
3 फ्लोराईडयुक्त पाण्याने चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात
Just Now!
X