चांदीनगरी हुपरी येथून कोल्हापूर, इचलकरंजी व कागल या प्रमुख शहरांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास ८ एप्रिल रोजी हुपरी येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.
हुपरी या गावामध्ये चांदी व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या भागात औद्योगीकरणही सातत्याने वाढत आहे. या तुलनेत हुपरीशी असणारी दळणवळणाची व्यवस्था मात्र अपुरी ठरत आहे. विशेषत: कोल्हापूर, इचलकरंजी व कागल या तीन प्रमुख शहरांशी जोडला गेलेला रस्ता अरूंद व नादुरुस्तआहे. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या तीन मार्गाशी जोडला जाणारा रस्ता रुंद करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कार्यकारी अभियंता वेदपाठक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, हातकणंगले तालुका प्रमुख बाजीराव पाटील, उपजिल्हाप्रमुख सात्ताप्पा भवान, उपतालुका प्रमुख अप्पा पाटील, विभाग प्रमुख संजय वाईंगडे आदींनी केले.