कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४५ हजार शेतकऱ्यांना ११३ कोटी रुपयांचे कर्ज व त्यावरील ८० कोटी रुपयांचे व्याज अशी १९३ कोटी रुपयांचा भुर्दंड लागू केला आहे. राज्यात फक्त कोल्हापूर जिल्ह्य़ातच ही पक्षपाती कारवाई सुरू आहे. याविरुद्ध ६ जानेवारी रोजी जिल्ह्य़ातील गटसचिव, बँक नोकर व शेतक ऱ्यांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष कॉ.संभाजीराव चाबूक यांनी दिली.
केंद्र शासनाने देशातील शेतक ऱ्यांची कर्जमाफी केली. कोल्हापूर जिल्ह्य़ाला सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. मात्र नाबार्ड व जिल्हा बँक यांनी केलेल्या चुकीच्या कार्यवाहिमुळे पुन्हा एकदा ४५ हजार शेतक ऱ्यांकडून १९३ कोटी रुपयांची कर्ज आकारणी केली जात आहे. याविरुद्ध शेतक ऱ्यांचा लढा उभा करण्यात आलेला आहे. या लढय़ामध्ये शेतक ऱ्यांच्या बरोबरीने जिल्ह्य़ातील गटसचिव व बँकेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
दरम्यान या प्रश्नासंदर्भात खासदार सदाशिवराव मंडलिक यांना कोल्हापूर जिल्हा गटसचिव संघटना, कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉइज युनियन व शेतकरी संघर्ष समितीचे शिष्टमंडळ भेटले. कर्जमाफीस अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधी आपली भूमिका नाबार्डला पत्र लिहून स्पष्ट करणार असल्याचे मंडलिक यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींना सांगितले.
शिष्टमंडळात कॉ.गोविंद पानसरे, कॉ.चाबूक, कॉ.आनंदराव परूळेकर, कॉ.नामदेव गावडे, विष्णू पाटील, भगवान पाटील, गोपाळराव भुयेकर, रघुनाथ बर्गे, प्रकाश टिप्पणावर आदींचा समावेश होता. खासदार राजू शेट्टी व गृहराज्यमंत्री यांनाही लवकरच शिष्टमंडळ भेटणार आहे.