नवी दिल्लीतील पीडित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते.
नवी दिल्ली येथील अत्याचार पीडित युवतीच्या हल्लेखोरांना फाशीची शिक्षा व्हावी, बलात्काराच्या गुन्ह्य़ातील आरोपींवर जलद कृती न्यायालयात दावा चालविण्यात यावा, महिलांना संरक्षण मिळावे, अश्लिल चित्रपटांवर बंदी घालावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौकातून सुरू झालेल्या मोर्चामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी अधिक संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मेघा पानसरे, गिरीष फोंडे, शिवाजी माळी आदींची भाषणे झाली. त्यानंतर मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी राजाराम माने यांना भेटले. त्यामध्ये दीपिका क्षीरसागर, अनुराधा पाटील, प्रशांत आंबी, किरण कांबळे, राहुल कांबळे आदींचा समावेश होता.