बांधकाम कामगारांसाठी शासनाने लागू केलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हय़ातील बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये जिल्हय़ातील बांधकाम कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या कामगारांनी केंद्र शासनाविरुद्ध सुरू असलेल्या कामगारांच्या लढय़ाला पाठिंबा जाहीर केला.     
कोल्हापूर शहरासह जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातून बांधकाम कामगार मोर्चात सहभागी होण्यासाठी दसरा चौक येथे जमले होते. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. फोर्ड कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कामगारांनी संघटनेचे लाल बावटे हातात घेतल्याने मोर्चाचा परिसर लाल रंगात हरवला होता. संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली.    
मोर्चाचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेतली. राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी सुमारे १८ प्रकारच्या कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. कामगारांना ओळखपत्र देण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी माने यांनी सहायक कामगार बी. डी. गुजर यांना २० दिवसांमध्ये कामगारांना ओळखपत्रे द्यावीत, असा आदेश दिला.