दोन दिवसांपुर्वी झालेल्या जिल्हा नियोजनच्या सभेत अधिकाऱ्यांनी चाऱ्याचा प्रश्न व ऊस उपलब्ध होण्यासाठी साखर कारखाने बंद ठेवावे लागतील, असे स्पष्ट केले होते. परंतु चाऱ्याचे नियोजन न करता पालकमंत्री पाचपुते यांनी कारखानदारांच्या दबावातुन त्यास विरोध केला. पाचपुते यांना पशुधनापेक्षा कारखाना जास्त महत्वाचा वाटत आहे, अशी टिका आ. कर्डिले यांनी केली. रोहयोचा निधी राखीव असतो, कायद्याने मजुरांना १५ दिवसांत वेतन देणे बंधनकारक आहे, तरीही दोन-दोन महिने वेतन मिळत नाही मग नरेगाचा निधी केला कोठे, कोणी खाल्ला? असा प्रश्न गाडे यांनी केला.

पालकमंत्री बबनराव पाचपुते जिल्ह्य़ातील टंचाई प्रश्नावर खोटे बोलुन दिशाभुल करत असल्याने टंचाई परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप, शिवसेना व आरपीआय महायुतीच्या वतीने पुढील शनिवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व सेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टंचाई परिस्थिती असुनही पाणी योजनांचे वीज जोड तोडले जात आहेत, दुष्काळी परिस्थितीमुळे, गाव तेथे जनावरांच्या छावण्या सुरु कराव्यात, नरेगा योजनेतील मजुरांना दोन-दोन महिन्यांपासुन वेतन मिळालेले नाही, टंचाई परिस्थितीमुळे पुढील दहा महिन्यांचे नियोजन करण्यात प्रशासन व पाचपुते अपुरे पडले आहेत, पाणी व शेतीची वीज जोड तोडू नये, रात्रीचे भारनियमन बंद करावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अंबादास पंधाडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासुन बुऱ्हाणनगर, मिरी-तिसगाव, घोसपुरी, कुरणवाडी पाणी योजनांचे वीज जोड तोडले गेल्याने ऐन दिवाळीत अनेक गावांवर पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे, दोन दिवसांत हा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीने डिसेंबर २०१२ अखेर राज्य वीजकपात मुक्त करण्याचे अश्वासन दिले होते, त्याची पुर्तता न झाल्यास दोन्ही पक्षांच्या नेत्यांना गावा-गावात फिरु देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाचपुते केवळ बैठका घेतात, परंतु त्यांच्या आदेशाचे पालन अधिकारी करत नाहीत, टंचाईच्या प्रश्नावर ते खोटे बोलुन दिशाभुल करत आहेत, त्यांच्या आदेशास केराची टोपली दाखवली जात आहे अशी टिका कर्डिले व गाडे यांनी केली. पाणी योजनांची वीज तोडल्यानंतर दोन दिवसांतच टंचाई निधीतुन त्याचे थकित बील भरले जाईल, असे सांगितले होते, प्रत्यक्षात त्यांनी शब्द पाळलाच नाही, अधिकारीही वाहनातुन फिरुन गावात काँग्रेस गवत दिसले तरी छावण्या बंद करत आहेत, छावण्या सुरु करण्याचे आदेश दिल्याचे पातपुते सांगतात प्रत्यक्षात जिल्ह्य़ातील ९० टक्के छावण्या बंदच आहेत, नरेगा योजनेतील २१ कामांपैकी केवळ शौचालयाचेच काम होऊ शकते इतर कामांसाठी इतक्या अटी लागु केल्या की ती कामे होउच शकत नाहीत, गावात टँकरच्या खेपाही पुर्ण होत नाहीत, जनावरांच्या पाण्याची सोयही केलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.