दलित समाजातील देवदासींना अनुदानासह घरकुल मागणी प्रस्ताव योजना मंजूर करावी, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे पेन्शन मिळावी, वयाची अट रद्द करून वंचित राहिलेल्या देवदासींचे सर्वेक्षण करून त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, या आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय जिल्ह्यातील देवदासी महिलांच्या मेळाव्यात एकमताने झाला. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अशोक भंडारे होते.
दलित समाजातील तमाम देवदासी महिलांच्या न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापुरात देवदासी महिलांचे आंदोलन सातत्याने सुरू आहे. मुख्यमंत्र्यांपासून महिला बालविकासमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त संचलनालय यांना वेळोवेळी अनेक निवेदने सादर केली आहेत. परंतु तुटपुंज्या पेन्शनशिवाय राज्य शासनाने अद्याप ठोस कार्यक्रम अगर धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्य विधानसभेचे मुंबई येथे अधिवेशन सुरू असून, या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय मेळाव्यात एकमताने झाला.