जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी यंत्रमाग कामगारांसाठी ८५ पैसे मजुरी  देण्याचा प्रस्ताव मंगळवारी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीने स्वीकारला आहे. मात्र त्यांनी दिलेला १६.६६ टक्के बोनसचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ८५ पैसे मजुरीचा निर्णय अमलात आणावा, या मागणीसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
इचलकरंजीतील २५ हजारांहून अधिक यंत्रमाग कामगारांनी मजुरी वाढीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता महिन्याचा कालावधी होत आला तरी अद्याप निर्णय झालेला नाही. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात अडीच तास चर्चा होऊनही बैठक निष्फळ ठरली. बैठक संपतेवेळी जिल्हाधिकारी माने यांनी ८५ पैसे मजुरी  व दिवाळीसाठी १६.६६ टक्के बोनस तसेच बोनस नको असेल तर ९९ पैसे मजुरी असे दोन प्रस्ताव यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींसमोर सादर केले होते. या प्रस्तावावर आपले मत दोन दिवसात कळवावे, असेही त्यांना सांगण्यात आले होते.    जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाची आज थोरात चौकात झालेल्या कामगारांच्या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाचे स्वागत करण्यात आले. मात्र त्यातील अंशिक बाजू स्वीकारण्यात आली. कामगार नेते मिश्रीलाल जाजू म्हणाले,‘‘ जवळपास महिनाभर कामगारांचे आंदोलन सुरू आहे. कामगारांच्या संघर्षांमुळे त्यांना चांगली मजुरी मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ८५ पैसे मजुरी देण्याचा प्रस्ताव आपण स्वीकारत आहोत, मात्र सध्या बोनस हा विषय नसल्याने त्याबाबत आपण त्यांना कांही कळविणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी ८५ पैसे मजुरीची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा निघणार आहे,’’ असेही त्यांनी घोषित केले. मेळाव्यात कॉ.दत्ता माने, भरमा कांबळे, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, सचिन खोंद्रे, परशराम आगम, शिवानंद पाटील, मदन मुरगुडे, हणमंत लोहार, सुखदेव लाखे आदींची भाषणे झाली. या बैठकीला कामगारांची मोठी उपस्थिती होती.