सध्या अनधिकृत बांधकामामुळे डोंबिवली गाजत असून येथील इमारतींवरील मोबाइल टॉवरच्या संख्येतही कमालीची वाढ झालेली आपणास दिसून येत आहे. या टॉवरचे भाडेही जवळजवळ लाखाच्या घरात असल्यामुळे नवीन इमारत बांधल्याबरोबर त्याचे जे मालक अथवा बिल्डर मोबाइल टॉवरवाल्यांशी संपर्क  साधून आमच्या इमारतींवर टॉवर उभारा, अशी विनंती करतात व त्यांना मिळणारे लाखो रुपये भाडे आपल्या खिशात टाकतात.
येथील शेकडोहून अनेक इमारतींवर सध्या मोबाइल टॉवर असल्याचे आपल्या निदर्शनास येते. काही इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन सात वर्षे उलटली तरीही त्या इमारतींची सोसायटी झालेली आपणास दिसून येत आहे. सोसायटी केली नाही की, या टॉवरचे जे भाडे मिळते ते मालक अथवा बिल्डर आपल्या खिशात टाकतो. येथील संत नामदेव पथावर श्री गजानन कृपा नावाची इमारत आहे ती पूर्ण होऊन आज चार वर्षे झाली. इमारत बांधून पूर्ण झाल्याबरोबर येथील बिल्डरने त्या इमारतींवर टॉवर उभारायला परवानगी दिली. आज जवळजवळ वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांचे सात टॉवर्स या इमारतींवर आहेत. म्हणजे प्रत्येक टॉवरचे भाडे ८० हजार रुपये अंदाजे धरले तरी सात टॉवरचे दरमहा पाच लाख साठ हजार रुपये हा बिल्डर स्वत:च्या घशात घालत आहे, कारण सोसायटी झाल्यावर हे पैसे सोसायटीला मिळतील, या भीतीने हे बिल्डर सोसायटी करायला टाळटाळ करतात.
येथील अनेक इमारती पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली परंतु या टॉवरच्या पैशाच्या हव्यासापायी हे बिल्डर सोसायटी होऊ देत नसावेत, अशी शंका डोंबिवलीकर व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात गेल्या विधानसभा बैठकीत इमारतींवर टॉवर उभारणाऱ्या सोसायटय़ा, बिल्डरांवर फौजदारी खटले लवकरच दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जर हे सोसायटीवाले मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले तर या बिल्डरांचे डोके ठिकाणावर येईल. कारण या टॉवरमुळे आज अनेक जण आजारी पडल्याचे रुग्णालयातील संख्येमुळे आपल्या निदर्शनास येत आहे.
गजानन कृपा इमारतीतील व अन्य सोसायटीवाले यांनी स्थानिक प्रशासनाकडे बिल्डरविरुद्ध तक्रार दाखल केली होती परंतु त्यांनी त्यास केराची टोपली दाखविली असावी, असे काही डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे.
या संदर्भात येथील काही बिल्डरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही सोसायटी करायला तयार आहोत. परंतु त्यातील काही जणांचे पैसे येणे बाकी आहे. तर काही जण आमच्यासमोर गोड गोड बोलतात व पाठ फिरली की आमच्याविरुद्ध बोलतात. तसेच सोसायटी   न करायचे आणखी एक कारण म्हणजे काही गाळे व घरे अजून विकायची बाकी असल्यामुळे सोसायटी होत नाही, जर सर्व रहिवासी एकत्र आले तर आम्हाला सोसायटी करायला काहीच प्रॉब्लेम नाही. व मोबाइल टॉवरचे भाडे म्हणाल तर सोसायटी झाल्यावर किंवा अर्धे-अर्धे भाडे देण्यास समझोता होऊ शकतो, असे काही बिल्डरांचे म्हणणे आहे.