केदारनाथ येथे अडकलेल्या या जिल्ह्य़ातील आणखी काही यात्रेकरूंची नावे समोर आली असून यातील काही लोकांशी संपर्क झाला, तर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अजूनही ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गुरूदत्त ट्रॅव्हल्सने जिल्ह्य़ातील काही लोक केदारनाथला गेल्याची माहिती मिळल्यानंतर प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
केदारनाथ येथील यात्रेत जिल्हय़ातील २१ लोक सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने काल गुरुवारी माध्यमांना दिल्यानंतर यातील काही लोकांशी प्रशासनाचा संपर्क झाला आहे. बल्लारपूर येथील कमल व अक्षय अट्टल कुटुंबीय केदारनाथला गेले होते. हे दोघेही सुखरूप बल्लारपूर येथे पोहोचले आहेत, तर गांधी चौकातील रहिवासी हेमंत बुटन (४३), कविता हेमंत बुटन (३८), खुशबू हेमंत बुटन (१५), खुशी हेमंत बुटन (१२), गणेश हेमंत बुटन (८), धनराज सोनी (५०), चंदा धनराज सोनी (४५) व त्यांचे हैदराबाद येथील पाच नातेवाईक, असे बारा जण केदारनाथला गेले होते. काल गुरुवार २० जूनपर्यंत या बारा जणांचा संपर्क झालेला नव्हता. प्रशासनाने आवाहन करताच हेमंत बुटन यांनी आज सकाळी मदत व पुनर्वसन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सर्व बारा जण बद्रीनाथ येथे सुखरूप असल्याचे कळविले. ब्रद्रीनाथ येथे बुटन कुटुंबीयांना मदतकार्य न मिळाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. ब्रदीनाथ येथून आता हे बाराही जण हरिव्दार येथे निघाल्याची माहिती प्रशासनाने दिली, तर गुरूदत्त ट्रॅव्हल्सने जिल्ह्य़ातील काही लोक केदारनाथ येथे गेले असल्याची माहिती आज समोर आली.
जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात विचारले असता दिल्ली येथून यासंदर्भात विचारणा झाली असून गुरूदत्त ट्रॅव्हल्स कंपनीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली, तर यात्रेसाठी गेलेले करुणा शोभावत,ुरेंद्र शोभावत, मनाली शोभावत, पीयूष वैष्णव चंद्रपूरच्या दिशेने निघाले असल्याची माहितीही दिली. दरम्यान, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. पौनीकर या १५ जूनला गौरीकुंड येथे होत्या. याच दिवशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून नागपुरातील घरी, तसेच कार्यालयीन सहकारी बोरीकर यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर पौनीकर यांचा भ्रमणध्वनी बंद झाला असून आजपर्यंत संपर्क झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने उत्तराखंड राज्यातील रुद्रपयाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत व पुनर्वसन विभागात दूरध्वनी करून स्मिता पौनीकर यांच्याबद्दल चौकशी केली. मात्र, त्यांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नसल्याचे या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले. जिल्ह्य़ातील लोक केदारनाथ येथे गेले असतील तर त्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधून नाव कळवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दु:खाचा असाही ससेमिरा!
गेल्या पाच दिवसांपासून केदारनाथहून बेपत्ता असलेल्या महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांच्या कुटूंबाला याच काळात बरेच आघात सहन करावे लागले. त्या यात्रेला गेल्यानंतर त्यांच्या नागपुरातील घरी दरोडा पडला. घरातील सामान लुटून नेतांना दरोडेखोरांनी त्यांच्या आईला जबर मारहाण केली. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. याच काळात त्यांच्या भावाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर आता पौनीकर यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय कमालीचे हतबल झाले आहे.