गतवर्षीच्या तुलनेत दस्त नोंदणी कमी होऊनही यंदा सह जिल्हा निबंधक कार्यालयाने महसूल उत्पन्न वाढवले. एकूण ४६ हजार ८२८ दस्तनोंदणी करताना या कार्यालयास सुमारे ८० कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
जिल्ह्य़ात १६ तालुके असले, तरी १७ ठिकाणी उपनिबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयामार्फत सदनिका, प्लॉट, निवासस्थान तसेच शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. सर्वच तालुक्यात प्रत्येकी एक तर नांदेड शहरात दोन उपनिबंधक कार्यालय आहेत. राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी सर्वच जिल्ह्य़ाला महसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. गतवर्षी जिल्ह्य़ास ७० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ५२ हजार १४७ दस्तनोंदणी करताना या कार्यालयाने सुमारे ७७ कोटींचा महसूल मिळवला. यंदा दस्तनोंदणी कमी झाली असली, तरी नोंदणी शुल्क वाढल्याने महसुलावर कोणताही परिणाम झाला नाही. नांदेड जिल्ह्य़ाला यंदा ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. मार्चअखेर या कार्यालयाने सुमारे ८० कोटी रुपये महसूल मिळवला. ६१ कोटी ७१ लाख थेट मुद्रांक नोंदणी शुल्कातून मिळाले, तर उर्वरित रक्कम ई-स्टॅम्पिंगच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा झाले. गतवर्षी वसुलीची टक्केवारी १२९.४३ होती. यंदा त्यात वाढून होऊन १३०.३३ वसुली झाली.