राज्यातील महापालिकांवर लादलेल्या एलबीटीच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी कृती समितीने शुक्रवारी महामोर्चा काढून सरकारचा निषेध केला. सरकारच्या आडमुठय़ा धोरणाच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी सुरू केलेले आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गेल्या पाच दिवसापासून एलबीटीच्या विरोधात व्यापार बंद आंदोलन सुरू असताना सरकार मात्र एलबीटी लागू करण्याच्या निर्णयावर ठाम असून कुठलाही तोडगा निघण्याची शक्यता सध्यातरी दृष्टिपथात नाही. व्यापारांनी आता जोरदार रणशिंग फुंकले असून कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे न घेण्यात येणार नसल्याचा इशारा दिला. आंदोलनामुळे गेल्या पाच दिवसात १२०० ते १५०० कोटीची उलाढाल ठप्प झाली असून त्याचा फटका सरकारलाही बसला आहे. शहरातील विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी आणि व्यापारी सकाळी मस्कासाथ चौकात संघटीत झाल्यावर त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश मंत्री, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल तर संयोजक मयूर पंचमातिया यांच्या नेतृत्वात स्कूटर मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर किराणा ओळ, भंडारा रोड, तीननल चौक, लाल इमली, गांजाखेत चौक, हंसापुरी, दोसरभवन चौक,गीतांजली टॉकीज, अग्रसेन चौक, चितारओळ, केळीबाग रोड, टिळकपुतळा, कॉटेन मार्केट, लोहा पुल, सीताबर्डी, मुंजे चौक, झाशी राणी चौक, शंकरनगर चौक, लक्ष्मीभवन, लॉ कॉलेज, लेडीज क्लब, सदर, गड्डीगोदाम, लिबर्टी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर त्या ठिकाणी सभा झाली. रमेश मंत्री यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन                  दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा विसर्जित झआल्यावर चेंबरच्या कार्यालयात आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.  दरम्यान पाचव्या दिवशी शहरातील किरकोळ विक्रेत्यांची दुकाने सोडली तर मुख्य बाजारपेठ बंद होत्या. हंसापुरी, मस्कासाथ, गांधीबाग, सीताबर्डी, इतवारी बाजार, सराफा ओळ, धान्य बाजार, गांधीबाग कपडा मार्केट आज बंद होती. आजच्या मोर्चामध्ये किरकोळ विक्रेते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी दीपेन अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार ‘बंद’मध्ये चिल्लर विक्रेते सहभागी होऊ लागले आहे. चिल्लर विक्रेत्यांना माल देणे बंद करण्यात आल्यामुळे त्यांना बंदमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अनेकदा पत्र पाठविले. त्यांच्याशी तीनवेळी फेडरेशनच्या अधिकाऱ्याशी चर्चा झाली मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे व्यापारी संघटना सुद्धा आंदोलन मागे घेणार नसल्याचे अग्रवाल यांनी         सांगितले. ोरकारने एलबीटीच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर चौका चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आंदोलनाला पाठिंबा जाही केला  आहे.