महाराष्ट्रात असंसर्गजन्य आजारांमधील सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह असून नाशिकमधील ३१ टक्के महिला व पुरूषांना या आजाराचा अधिक धोका असल्याचे इंडस हेल्थ प्लसच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठी जीवनशैली, खाण्याच्या अपायकारक सवयींमुळे १८ ते ३० वर्षे वयोगटातील भारतीयांना मधुमेहाने ग्रासलेले दिसून येते. भारतात मधुमेहाचे ६७ दशलक्ष रूग्ण आहेत. २०३० पर्यंत भारतात मधुमेहाचे जवळपास १०० दशलक्ष रुग्ण असतील, असा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे. ३०ते ४० वर्षे वयोगटात जास्तीत-जास्त मधुमेहाचे रूग्ण आढळून आले आहेत. पाच ते सात टक्के मधुमेहाच्या रूग्णांमध्ये या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्याचे आढळून आले आहे. १५ टक्के लोकांना तो बैठय़ा जीवनशैलीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. स्थूलपणा आणि ताण यामुळे २५ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्रियांना मधुमेहाचा धोका अधिक तर, १२ टक्के मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकारही जडला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढण्यामागे अतिताण आणि लठ्ठपणा ही सामान्य कारणे असल्याचे दिसून येते. बैठी जीवनशैली, खाण्याच्या अयोग्य सवयी, चरबीयुक्त आहाराचे आणि तळलेल्या पदार्थाचे मोठय़ा प्रमाणावर केले जाणारे सेवेन आणि व्यायामाचा अभाव यामुळे नाशिकमध्ये मधुमेह वाढीस लागला आहे. डॉक्टरांच्या तपासणीतून असे दिसून आले आहे की, ३० टक्के मधुमेहाचे निदान झालेल्या लोकांना हा आजार झाल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे या आजाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. जवळपास आठ टक्के मधुमहाने ग्रस्त लोकांमध्ये श्रवणदोष आणि अंधूक दृष्टीची समस्या आढळून आल्याचेही अहवालात म्हटले आहे.
इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त व्यस्थापकीय संचालक अमोल नाईकवाडी यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मधुमेहाच्या रुग्णांच्या प्रमाणात ७-१० टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद केले. मधुमेहाचे निदान लवकर झाल्यास या आजाराची गुंतागूंत कमी करता येते.
सर्वसाधारण माणसासारखे आयुक्त जगता येते. रक्तातील शर्करेची पातळी नियमितपणे तपासणे, फायबर, पूर्ण धान्ये यांनी युक्त आहार घेणे, योग्य तितके वजन राखणे आणि नियमितपणे व्यायाम करणे या उपायांनी मधुमेहाला आळा घालता येतो किंवा त्याला प्रतिबंध करता येतो. खूप तहान लागणे, अधिक वेळ लघवीस होणे, सतत भूक लागणे, वजन कमी होणे या लक्षणांकडे सहज दुर्लक्ष होत असल्याने मधुमेह बळावत असल्याचेही नाईकवाडी यांनी सांगितले.