गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पर्यावरणातील असमतोलामुळे अंगणातील चिऊताई, झाडावर काव काव करणारा कावळा, वाळवणावर चोच मारत हळूच उडणारी साळुंकी आणि म्हशीच्या पाठीवर बसलेला बगळा.. असे सारे पक्षी दिसेनासे झाले आहेत. अंगणातील या पक्षिमित्रांची आजच्या पिढीला पुसट होत चाललेली ओळख नव्याने करून देण्याच्या उद्देशाने येथील नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘चला पक्षी मोजू या..’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, त्या अंतर्गत ७० हून अधिक प्रजातींचे पक्षी शहर परिसरात आढळले असून त्यांच्या वेगवेगळ्या लकबींचा अभ्यास करण्यात आला. नाशिककरांना पक्ष्यांची ओळख व्हावी, पक्ष्यांची आजची स्थिती, प्रदूषणामुळे पक्षिजीवनावर झालेले परिणाम, पक्ष्यांची बदलती घरटी, नायलॉन मांज्यांचा परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी क्लबने या अभिनव उपक्रमाची आखणी केली. मागील आठ दिवसांत पक्षिमित्र विविध परिसर, धरण, गोदा पार्क, उद्याने येथील अभ्यास टिपणे घेण्याचा प्रयत्न करीत आहे. संत गाडगे महाराज धर्मशाळेपासून नाशिक स्मशानभूमी, रामकुंड, गोदापार्क, घारपुरे घाट, केटीएचएम महाविद्यालय बोट क्लब, आनंदवली, गंगापूर धरण येथे पक्षिगणना करण्यात आली. एका दिवसात तब्बल ‘ग्रास लॅण्ड’ आणि ‘वॉटर बर्ड’ परिसरात राहणाऱ्या ७० जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. स्मशानभूमी परिसरात २५ जातींचे पक्षी दिसले तसेच याच परिसरात ‘जाकाना’ हा पक्षी प्रथमच पाहावयास मिळाला. या मोहिमेत ‘ग्रास लॅण्ड’ पक्ष्यांमध्ये ५० जातींचे तर पाण्यात राहणाऱ्या २० पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
अभ्यासात सर्वच पद्धतीने वाढलेल्या प्रदूषणाच्या पातळीकडे मुख्यत्वे लक्ष वेधण्यात आले. ठिकठिकाणी प्रदूषित सांडपाणी थेट गोदापात्रात सोडण्यात आले होते. परिणामी, संत गाडगे महाराज धर्मशाळा परिसरात राहणारे बगळे स्थलांतर करून अमरधाम परिसरात वसाहत करून राहत असल्याचे दिसून आले. घार आणि शराटी या पक्ष्यांनी प्रचंड वृक्षतोडीमुळे उंच झाडांचा आश्रय घेण्याऐवजी ते आता भ्रमणध्वनी वा तत्सम मनोऱ्यांचा आधार घेऊन घरटी बनवू लागली आहेत. सुगरणीच्या खोप्यात तर मुनियाने शिरकाव करीत खोप्यात स्वत:चे घरटे तयार केले आहे. असे काही वेगळेच चित्र समोर आले. संक्रांतीचा सण काही दिवसांपूर्वीच उत्साहात साजरा झाला. या वेळी पतंगोत्सवात नायलॉन धाग्याचाही मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. त्याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. ठिकठिकाणी झाडावर नायलॉन मांजा अद्याप लटकलेला आहे. हा धागा लवकर नष्ट होत नाही. यामुळे गोदा पार्क परिसरात एक कावळा आणि वटवाघूळ मांज्यात अडकून मरण पावल्याचे आढळून आले. पक्षिमित्रांनी स्वयंस्फूर्तीने झाडांवरील मांजा काढण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या हेतूच्या दृष्टीने नायलॉन मांज्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी पक्षिमित्रांनी केली. या मोहिमेत क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, प्रमिला पाटील, रमेश वैद्य, रवींद्र वामनाचार्य आदी पक्षिमित्र सहभागी झाले.