आपापल्या घरी आभावानेच कधीतरी स्वयंपाकघरात गॅस अथवा स्टोव्हशी संपर्क आलेली हजारो शाळकरी मुले-मुली शनिवार ४ जानेवारी रोजी केशवसृष्टीच्या संकल्पीत एनर्जी पार्कमध्ये चक्क सौर कुकरवर स्वयंपाक करणार आहेत. भविष्यात भेडसावणाऱ्या इंधन टंचाईला तोंड देण्यासाठी पुढील पिढीने सज्ज व्हावे म्हणून किशोरवयातच मुलांवर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे संस्कार करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात असून त्यात मुंबई-ठाण्यातील तब्बल साडेतीन हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भाग घेणार आहेत. विशेष म्हणजे शिजविलेल्या अन्नावर ताव मारल्यानंतर मुले आपापला सौर कुकरही घरी नेणार आहेत. पर्यावरणस्नेही संस्कारासाठी जुळवून आणलेल्या हजारो सौर कुकरमधील स्वयंपाकाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे.
सूर्यकुंभ असे या कार्यक्रमाचे नाव असून याप्रसंगी सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, आचार्य नम्रमुनी महाराज, उद्योगपती विठ्ठल कामत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नावे नोंदवली आहेत. सहभागी सर्व विद्यार्थी आधी स्वत: सौर कुकरची जोडणी करतील. त्यानंतरच ते या कुकरमध्ये अन्न शिजविणार आहेत. चौथी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात भाग घेणार आहेत. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमानिमित्त पर्यायी ऊर्जेवर आधारित विविध उत्पादनांचे तसेच प्रयोगांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सौर कुकर, सौर पॅनल्स, सौर पंप, गॅसीफायर, सौर ड्रायर तसेच बायोमास तत्त्वावरील सयंत्राचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार आहे.
रेवा-महिंद्रा कंपनीची सौरऊर्जेवर चालणारी कार हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर सौरऊर्जेचे महात्म्य बिंबविणारा हा प्रयोग केवळ एक दिवसापुरता मर्यादित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना त्यांनी जुळणी केलेला सौर कुकर भेट म्हणून दिला जाणार आहे.
पर्यावरणस्नेही सृष्टी
भाईंदरमधील उत्तम येथील केशवसृष्टीत इतर अनेक प्रकल्पांबरोबरच जाणीवपूर्वक पर्यावरणस्नेही उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रज्जूभैय्या ऊर्जा उद्यानाची निर्मिती केली जात आहे, अशी माहिती केशवसृष्टीचे उपाध्यक्ष सतीश सिन्नरकर यांनी दिली. भविष्यकाळात हे उद्यान पर्यायी ऊजास्त्रोतांचे महत्त्व अधोरेखीत करणार आहे.