कृष्णा काठच्या दत्त मंदिरात श्रीं चे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी दोन लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. देवस्थान समिती व ग्रामपंचायतीने दर्शनासाठी नेटके नियोजन केले होते. दिवसभर मंदिरात धार्मिक विधी मंगलमय वातावरणात सुरू होते.     शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी हे श्री दत्ताचे तीर्थक्षेत्र सर्वदूर ख्याती पावलेले आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांतून येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दत्त जयंतीला तरयेथे गर्दीचा महापूर लोटलेले असतो. याचाच प्रत्यय आज दत्त जयंतीनिमित्त येथे पाहावयाला मिळाला. विशेष म्हणजे गुरुवार हा श्री दत्ताचा वार म्हणून ओळखला जातो. गुरुवारी दत्त जयंती आल्याने भाविकांच्या संख्येमध्ये आणखी वाढ झाली होती.    
श्री दत्ताचे दर्शन भाविकांना व्यवस्थित रीत्या घेता यावे, यासाठी देवस्थान समितीच्या वतीने चार रांगा केल्या होत्या. त्यामध्ये मुख्य व मुखदर्शन अशी विभागणी करण्यात आली होती. भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. तर ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सुविधा नेटकेपणाने राबविल्या होत्या. पहाटे पाच वाजता प्रात:कालीन पूजेने धार्मिक विधीला सुरुवात झाली. सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत भाविकांचे अभिषेक झाले. दुपारी साडेबारा वाजता महापूजा करण्यात आली. दुपारी ३ ते ४ या वेळेत अवमान पंचयुक्त पठण झाले. ४ वाजता श्रीं ची मूर्ती जन्मकाळासाठी सवाद्य मिरवणुकीने मुख्य मंदिरात आणण्यात आली. कीर्तनकार रोहित दांडेकर यांच्या कीर्तनानंतर सायंकाळी ५ वाजता जन्मकाळ सोहळा झाला. अबिर गुलालाच्या उधळणीत आणि गुरुदत्ताच्या जयघोषात भाविक दंग झाले. बाळकृष्ण वाडीकर यांच्या हस्ते जन्मकाळाचा पाळणा सुयोग मंगल कार्यालयात नेण्यात आला. रात्री उशिरा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा सुरू होता.    
भाविकांच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ातील विविध आगारातून ५५ जादा गाडय़ा सोडल्या होत्या. त्यांच्या दिवसभरात १७० फे ऱ्या झाल्या. देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ रूक्के, पुजारी सचिव महेश हावळ, विश्वस्त कर्मचारी हे दिवसभर भाविकांच्या नियोजनात व्यग्र होते. पोलीस उपअधीक्षक दिलीप कदम, पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांच्यासह ३० पोलीस बंदोबस्तासाठी होते. भाविकांच्या तुलनेत पोलिसांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसत होते. रांगेतील भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी एनसीसीचे छात्र व व्हाइट आर्मीचे जवान कार्यरत होते. तसेच पट्टीचे पोहणाऱ्या युवकांचे पथकही नदीकिनारी तैनात करण्यात आले होते.