नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून एक महत्त्वाचे शहर आहे. नागरीकरण झपाटय़ाने वाढत असून शहराची हद्दही दूरवर पसरलेली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. खासगी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे दुचाकी वाहनांची संख्या साडेदहा लाखावर पोहचली आहे.
शहरातील वाहनांच्या संख्येविषयी जागरूक नागरिक अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली.ोप्रादेशिक परिवहन वाहतूक कार्यालयाकडून मिळालेली माहिती शहरातील सार्वजनिक वाहतूक प्रणालीचे स्वरूप दाखविणारी आहे.
शहरात १२ लाख ७० हजार १६८ एवढी वाहनांची नोंद ३० डिसेंबर २०१३ पर्यंत आहे. त्यापैकी दुचाकी वाहने १० लाख ५८ हजार ५४७ दुचाकी वाहने आहेत तर १ लाख ३ हजार ६२३ मोटारकार आहेत. ४ लाख ४७ हजार २०४ मोटार सायकल, ३ लाख २७ हजार ५७२ स्कुटर्स, २ लाख ८३ हजार ७७१ मोपेड आहेत तर  ३० हजार ८४३ जीप १४ हजार ८४० डिझेल चारचाकी वाहने, ७ हजार १२० तीनचाकी डिझेल वाहने आणि ६४० नोंदणीकृत शालेय बसेस् आहेत.
 नागपूरची लोकसंख्या २१ लाखाच्या आसपास आहे. स्टारबस ही नागरिकांसाठी एकमेव सार्वजनिक वाहतूक सुविधा महापालिकेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या कोऱ्या स्टार बसेस् केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत मिळालेल्या असून २५० स्टार बसेस् धावत आहे. तसेच १७ हजार ४८० नोंदणीकृत ऑटोरिक्षा आहेत. ही वाहतूक व्यवस्था २१ लाख लोकसंख्येसाठी पुरेशी नसल्याचे खासगी वाहनांच्या संख्येवरून दिसून येते.
शहरात एकूण १ लाख ५४ हजार २०० वाहनांची नोंदणी १ जानेवारी २०१० ते ३० डिसेंबर २०१२ या तीन वर्षांच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. यातून करापोटी ३०५ कोटी ३१ लाख ५० हजार ६०७ रुपये शासनाला महसूल प्राप्त झाला.
सध्या शहरात १२ लाख ७० हजार १६८ वाहनांची नोंद आहे. यापैकी १० लाख ५८ हजार ५४७ दुचाकी वाहने आहेत. शहरात ५ लाख किमान कुटुंब आहे असे जर विचारात घेतले तर खासगी वाहनांची संख्या सरासरी प्रत्येक घरात दोन दुचाकी वाहने आहेत.