क्युलेक्स मादी डासांमुळे होणाऱ्या हत्तीरोगाच्या आजारांमध्ये गडचिरोली जिल्ह्य़ात दिवसेंदिवस वाढ होत असून राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात जिल्ह्य़ात हत्तीरोगाचे ४ हजार ६८६, तर अंडवृद्धी असलेले ४ हजार २२४ रुग्ण आढळून आलेले आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य द्यावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोके यांनी एका पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमात केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्य़ात सर्वाधिक चार्मोशी तालुक्यात १४०२ हत्तीपायाचे रुग्ण आढळले, तर अंडवृद्धी असलेले १०२५ रुग्ण आरमोरी तालुक्यात आढळून आले आहेत. याच तालुक्यात हत्तीरोगाचे ११४१ रुग्ण आढळले आहेत, तसेच गडचिरोली शहरात हत्तीपायाचे १५५ रुग्ण, तर अंडवृद्धीचे १८ रुग्ण असून वडसा शहरात हत्तीपायाचे १३३ व अंडवृद्धीचे ८१ रुग्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. २०१२ मध्ये बेसलाईन डाटा मोहीम राबविण्यात आली असता आणखी २२ रुग्णांचे रक्त दूषित आढळून आले. जिल्ह्य़ाची लोकसंख्या ११ लाख ७७ हजार २४२ असून ग्रामीण भागातील १० लाख ३६ हजार ७१ लोकसंख्येपैकी ९ लाख ६३ हजार ५४३ लोकांना, तर शहरी भागातील १ लाख ४१ हजार १७१ पैकी १ लाख ३१ हजार २८९ लोकसंख्येत हत्तीरोग दुरीकरण मोहिमेंतर्गत गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. आरोग्य कर्मचारी गृहभेटी देऊन नागरिकांना गोळ्या सेवन करण्यासाठी देणार आहेत. दोन वर्षांपेक्षा लहान मुले, गर्भवती स्त्रिया, गंभीर आजाराचे रुग्ण यांनी गोळ्या खाऊ नयेत, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या मोहिमेंतर्गत जिल्ह्य़ातील सर्व नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीत दिलेला उपचार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन रवींद्र ढोके यांनी केले. यावेळी हत्तीरोग अधिकारी पी.एन. उके, डी.पी. नन्नावरे उपस्थित होते.