फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया वेबसाइट्सवर दिवसांगणिक तरुणांची वाढती संख्या आणि त्यातून मिळणारी संभाव्य ग्राहकसंख्या ही बाब आता कंपन्यांपासून लपून राहिली नाही. तरुण ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी या मीडियाचा खुबीने वापर करण्याबाबत आता कंपन्या गंभीर होऊ लागल्या असून भारतातील तब्बल ९०टक्के कंपन्या आपल्या वार्षिक निधीतील सुमारे १५ टक्के निधीची तरतूद सोशल मीडियासाठी करत असल्याचे समोर येत आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचे लोण जगभरात वेगाने पोहोचले आहे. हातातील मोबाइलमुळे याचा वापर अजूनच सोईस्कर झाला आहे. सोशल मीडिया वेबसाइट्सकडे आतापर्यंत केवळ विरंगुळा म्हणून पाहिले जात होते. त्यावर आपल्या दिवसातील सर्वाधिक वेळ घालविणाऱ्या तरुणवर्गाकडे पाहून नाकेही मुरडली जायची. परंतु आजचा तरुण व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहत असतो. तसेच या माध्यमावर दिसल्या जाणाऱ्या गोष्टींकडे तो लगेच आकर्षित होताना दिसतो. त्यामुळे कंपन्या आता याच वेबसाइट्स आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम माध्यम ठरत असल्याची कबुली देताना दिसत आहेत. सोशल मीडियाची लोकप्रियता शहराइतकीच ग्रामीण भागातही पाहायला मिळते. त्यामुळे एकाच वेळी विविध स्तरांतील आणि विविध भागात राहणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यास सोशल मीडिया कंपन्यांना मदत करत आहे. ‘इआय इंडिया’ या कंपनीतर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामधून भारतीय कंपन्यांनी सोशल मीडिया साइट्सकडे गंभीरतेने पाहण्यास सुरुवात केल्याची बाब समोर आली आहे. २०१३च्या तुलनेत यंदाच्या वर्षांतील कंपन्यांची सोशल मीडियामधील गुंतवणूक वाढविल्याचे चित्र आहे. यामध्ये कंपन्यांनी पहिली पसंती फेसबुकला दिली असून त्याखालोखाल ट्विटर, यूटय़ूब ही माध्यमेही कंपन्यांना आकर्षित करू लागली आहेत. आजचा तरुण त्याच्या रोजच्या दिवसातील सर्वाधिक वेळ या माध्यमांवर घालवत असतो. या ग्राहकाचे लक्ष आपल्या उत्पादनाकडे त्वरित वळविण्यासाठी कंपन्यांनी सुरवात केली आहे. नेहमीच्या टीव्ही, वृत्तपत्र या माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात करणाऱ्या कंपन्यांमध्ये या वर्षी २०१३च्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. कंपन्यांनी सुमारे १० ते २० कोटींची तरतूद या सोशल मीडिया साइट्सवर मार्केटिंग करण्यास सुरवात केली आहे. तसेच यामध्ये कंपनीच्या वेबसाइट आणि पेजला जास्तीतजास्त व्ह्य़ुवरशिप मिळविण्याकडे कंपन्यांचा ओढा असून त्यापाठोपाठ सोशल मीडियासाठी खास जाहिराती बनविणे, विविध उपक्रम राबविणे, गमतीशीर खेळ तयार करणे अशा विविध उपक्रमांमधून जास्तीतजास्त लोकांना आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करून घेण्याकडे कंपन्या भर देताना दिसत आहेत.