एड्सबाधित मातांची ९५ टक्के बालके एचआयव्हीमुक्त

एड्सबाधित मातेकडून बाळाला होणारा संसर्ग रोखण्यासाठी सुमारे एक तपाहून अधिक काळ जे.जे. रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकल्पामुळे अशा मातांची तब्बल ९५ टक्के बालके एचआयव्हीमुक्त जन्माला अली आहेत. जे.जे.च्या स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रेखा डावर व त्यांचे सहकारी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची एक तपाची ही तपश्चर्या कोणालाही थक्क करणारी आहे.
गेल्या दशकात एचआयव्ही-एड्सच्या रुग्णांना हात लावण्यास डॉक्टरही तयार नसत. खासगी रुग्णालये तर एड्स रुग्णाला थेट शासकीय रुग्णालयातच पाठवून देत असत. अशावेळी एचआयव्ही-एड्सबाधित महिलांची प्रसुती सुरक्षितपणे करण्याचे तसेच बाळामध्ये एचआयव्हीची लागण होऊ न देण्याचे आव्हान डॉ. रेखा डावर यांनी यशस्वीपणे पेलले. प्रकल्पाच्या या यशाची दखल राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनीही घेतली असून त्यांनी मुक्तकंठाने त्याची प्रशंसाही केली आहे.
जे.जे.मधील कामाबाबत डॉ. रेखा डावर यांनी सविस्तर माहिती दिली. गेल्या एक तपाच्या कालावधीत ११६० मातांची प्रसुती जे.जे.मध्ये झाली. त्यातील ९५ टक्के मुले संसर्गमुक्त आहेत. एड्सबाधित मातेकडून बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलेच्या परवानगीने एचआयव्हीसह आवश्यक चाचण्या केल्या जातात. यात एचआयव्हीचे रुग्ण आढळल्यास त्यांचे योग्यप्रकारे समुपदेशन करावे लागते. पतीला एड्स असल्यास स्त्री त्याची शेवटपर्यंत सेवा करते. मात्र महिलेला एचआयव्ही झाला आहे व पतीला तो नसल्यास त्या महिलेची अवस्था अत्यंत वाईट होते. बहुतेक प्रकरणात पती पत्नीला सोडून देतो. अशावेळी त्या महिलेची मानसिक अवस्था व प्रसुती ही गंभीर गोष्ट असते. या महिलांवर उपचारांसाठी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन व राज्य एड्स नियंत्रण सोसायटीची मोठी मदत होते, असे अनुभवकथन डॉ. रेखा डावर यांनी यासंदर्भात केले.
सामान्यपणे जे.जे.च्या स्त्री रोग चिकित्सा विभागात वर्षांकाठी दोन हजाराहून अधिक प्रसुती होतात. याशिवाय हजारोंच्या संख्येने बाह्य़रुग्ण विभागात महिला विविध आजारांवरील उपचारासाठी येतात. परंतु एचआयव्हीबाधित गर्भवती महिलांकडून बाळामध्ये एचआयव्हीचा प्रसार होऊ नये यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे महत्त्व मोठे आहे. संपूर्ण राज्यातून अशा महिला प्रसुतीसाठी जे.जे. रुग्णालयात येत असतात. जे.जे.तील कामाची दखल घऊन उत्तर प्रदेश, गुजरात, नगालँड आदी राज्यांनीही डॉ. रेखा डावर यांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलावले आहे. डॉ. डावर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना नॅशनल एड्स नियंत्रण समितीतर्फे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ पुरस्कारही दिला आहे. महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेकडूनही यंदाच्या वर्षांसाठी सवरेत्कृष्ठ कार्यासाठी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.