काळानुरूप आईच्या वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सर्वत्र बदल झाले असले तरी, आईची ममता, वात्सल्य तेच आहे. आई ही सर्वासाठी प्रेरणादायक असते. गर्भसंस्कार तसेच आई व मुलांच्या नात्यावर व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, असे प्रतिपादन डॉ. आशालता देवळीकर यांनी केले.
येथील यशवंत महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘आई’ या विषयावर त्या बोलत होत्या. आई या शब्दात दोन अक्षरे येतात. याचा अर्थ ईश्वराचा आत्मा असा होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा पगडा आजच्या पिढीवर असून संस्कृतीही बदलू लागली आहे. बदलत्या जगात संस्कारहीन पिढी निर्माण होत असल्याने भविष्य अंधकारमय झाले आहे. यासाठी गर्भसंस्कार महत्वपूर्ण भूमिका निभावते. गर्भसंस्कार व बाळाचे संगोपन मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गरजेचे असते. जिजाऊमाता शिवाजी राजांना आदराने वागवत होत्या. त्यामुळेच त्यांच्या कानावर सतत राजे हा शब्द येत गेला. त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट होत गेला. अलीकडे आई आपल्या बाळाला कुठल्याही नावाने संबोधते. त्याला आदराने वागविणे गरजेचे आहे. तो आपला मुलगा किंवा मुलगी नसून तोही पुढे बाप किंवा आई होणार आहे. अशा व्यापक दृष्टिकोनातून त्याचे संगोपन होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. देवळीकर यांनी मांडले.
आईचे दूध हे बाळासाठी संजीवनी असते. त्यामुळे मातांनी बाळाला अवश्य स्तनपान करू द्यावे. या माध्यमातून संवेदना निर्माण होतात. बाळाची पाटी कोरी असते. तो जसजसा मोठा होतो तसतसा त्याच्या भोवतालच्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करतात. त्यामुळे आईने मुलाचा मेंदू विकसीत करण्यासाठी त्याचे संगोपन करताना विशेष संस्कार करणे गरजेचे आहे. सद्य परिस्थितीत जगाला बदलायचे असेल तर आईने तिचे मूळ स्वरूप टिकवून ठेवले पाहिजे. आईची ममता जगण्याची नवी उमेद निर्माण करते असेही त्यांनी नमूद केले.