सामाजिक बांधिलकेची जाणीव ठेऊन नेहमीच वेगळ्या वाटेने जात समाजपयोगी कर्तव्ये पार पाडीत इतरांसाठी नेहमीच ‘प्रेरणादा’यी ठरणाऱ्या येथील ‘प्रेरणा प्रतिष्ठान’ या संस्थेने यंदाही गुढीपाडव्याचा आनंद अनाथ बालाकांसमवेत साजरा करतानाच दुष्काळात होरपळून निघालेल्यांवर मदतीच्या रूपाने फुंकरही घातली.
सातत्याने आठ वर्षे ही संस्था येऊर येथील विवेकानंद बालकाश्रमात जाऊन तेथील अनाथ बालकांसमवेत प्रेमाची तसेच आपुलकीची गुढी उभी करत आहे. कोणत्याही शोभायात्रेमध्ये सहभागी न होता तसेच अनाठायी खर्च न करता ही संस्था विविध उपक्रम पार पाडत असते. यावेळीही संस्थेतर्फे विवेकानंद बालकाश्रमात जाऊन तेथे मुलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष किरण कुलकर्णी यांनी यावेळी तेथील मुलांना विविध साहित्यांचे वाटप केले. तसेच भविष्यात येथे मुलांसाठी संगणक देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केवळ संगणकच नव्हे तर त्यासाठी खास प्रशिक्षकही देण्यात येणार असल्याची ग्वाही कुलकर्णी यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात असलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर संस्थेतर्फे खारीचा वाटा उचलणार असल्याचे सांगत त्यांनी यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अतुल माने, खजिनदार किशोर साटले, सचिन पंजाबी, गाताडे आदी सदस्य उपस्थित होते.