झटपट पैसे कमविण्यासाठी चोरीचा मार्ग निवडणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांसह एका सराईत चोराला कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या मुलांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. कळंबोली, कामोठे परिसरात मोटारसायकल चोरी आणि घरफोडींमध्ये या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. अशाच पद्धतीने काम करणारी अजून एक टोळी पनवेल शहर पोलिसांनीही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुन्हे उघडकीस आले आहेत. कळंबोली पोलिसांनी या तिघा मुलांकडून ८ चोरीच्या मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत. या तिघा अल्पवयीन मुलांसह विलास डांगे (वय २९) या सराईत चोरालादेखील अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली.
या अल्पवयीन मुलांचा वयोगट १४ ते १७ आहे. ही टोळी पाळत ठेवून चोरीसाठी खिडकीला ग्रील नसलेल्या घराची निवड करायची. घरमालक नसताना स्कूड्रायव्हरच्या साहाय्याने स्लायिडगचे लॉक तोडून ही मुले घरात प्रवेश करत. अशा प्रकारच्या दोन घरफोडय़ा या मुलांनी केल्या असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.