लोखंडी सळ्या लोंबकळत असलेली मालमोटार चाक पंक्चर झाल्याने रात्रीच्या वेळी पार्किंग दिवे बंद ठेवून तशीच रस्त्यात उभी केली. या सळ्या दुचाकीस्वाराच्या तोंडास लागून तो गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर हा प्रकार घडला. सिद्धेश्वर पांडुरंग जाधव (वय २१) असे जखमी स्वाराचे नाव आहे. एमएच २१ एक्स २६६५ या क्रमांकाची मालमोटार फाळके उघडे ठेवून व सळ्या बाहेर आलेल्या अवस्थेत चालकाने दिवे बंद ठेवून रात्री रस्त्यावर उभी केली होती. मुख्याध्यापक असलेले जाधव चिकलठाण्याहून सिडकोकडे मोटरसायकलवर चालले होते. अंधारात समोर गाडी व सळ्या न दिसल्याने जाधव यांच्या तोंडाला सळ्या लागल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ धूत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोटरसायकलचेही या घटनेत नुकसान झाले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार विठ्ठल फरताळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.