News Flash

प्रशासनाविरुद्ध महापौरांनी दंड थोपटले

महापालिकेत भारिप-बमसं, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची सत्ता येऊन जवळपास १७ महिने होत आले आहेत, पण विकास कामे झालेलीच नाहीत.

| September 20, 2013 08:20 am

महापालिकेत भारिप-बमसं, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची सत्ता येऊन जवळपास १७ महिने होत आले आहेत, पण विकास कामे झालेलीच नाहीत. केवळ निधीवरून महापालिकेच्या सभेत गदारोळ होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. कोटय़वधीचा निधी केवळ पडून आहे व तो आता लवकर खर्च करण्यात आला नाही तर परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा वातावरणात सत्तारूढ आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचा खेळ चालू असून या प्रकाराला व शहराच्या अधोगतीला इतरांना दोषी कसे ठरविता येईल, याचेच डावपेच महापालिकेतील गट करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर महापौर ज्योत्स्ना गवई यांनी महापालिका प्रशासनाविरूद्ध धरणे आंदोलन सुरू केले आहे.
खुद्द महापौरांना आंदोलन करावे लागते, ही बाब आश्चर्याची व खेदाची मानली जात असून यातून नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील युद्ध सुरू झाले आहे. दरम्यान, भारिप-बमसंचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे व त्यांच्याशी चर्चा केल्याचे अधिकृत वृत्त आहे. चर्चेचा तपशील काही कळू शकला नाही, पण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या दुटप्पी धोरणाला कंटाळलेल्या भारिप-बमसंने सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. महापौरांचा राजीनामा वेळ येताच घेतला जाईल, असे यापूर्वीच या पक्षाचे गटनेते गजानन गवई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते.
सत्ताधाऱ्यांनी केवळ १० मिनिटात ३६ ठराव मंजूर करताना आपण काय करीत आहोत, याचा विचार तेव्हा केला नाही. महापौरांच्याच पक्षाला प्रशासनाविरुद्ध धरणे का द्यावे लागत आहे, याचे उत्तर त्यांनी शहरातील जनतेला द्यावे, असेही आवाहन विरोधकांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 8:20 am

Web Title: movement against municipal administration
टॅग : Congress,Vidarbh
Next Stories
1 यवतमाळ जिल्हा बँक संचालक निवडणूक प्रक्रियेला स्थगनादेश
2 महापालिकेचे आवाहन धुडकावून तलावांत बेधडक निर्माल्य विसर्जन
3 ‘श्री सूर्या’च्या घोटाळ्यांची जंत्री डोळे चक्रावणारी
Just Now!
X