रायगड जिल्ह्य़ातील म्हसळा तालुक्याच्या तहसीलदारांवर वाळू माफियाने हल्ला केला असून या विरोधात रायगड जिल्ह्य़ातील तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच कर्मचारी संघटनांनी एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात शासनाने वाळू माफियांवर कडक कारवाई करून तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
दहशतीवर शासन यंत्रणा अंकुश घालू शकली नसल्याने तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे या दहशतीचा निषेध करण्यासाठी सोमवारी कोकण विभाग तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच रायगड जिल्हा तलाठी संघटनेने एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन पुकारले. यात म्हसळा तहसीलदारांवरील हल्लेखोरांना अटक करा, बेकायदा वाळू उपशा विरोधात कारवाई करताना शासनाने आरटीओ तसेच पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी द्यावे या दोन मागण्या करण्यात आल्याची माहिती कोकण विभाग तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे सहसचिव पवन चांडक व  रायगड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एस.एम.तांबे यांनी दिली आहे. तसेच या आंदोलनातून निवडणुकीचे काम वगळण्यात आले आहे.