इंग्लंडमधील टर्नब्रिज वेल्समधील नेव्हिल ग्राऊंड.. १८ जून १९८३चा दिवस.. क्रिकेट विश्वचषकात आपल्या गटातून पुढे जाण्यासाठी भारत आणि झिम्बाब्वे एकमेकांसमोर भिडले. भारताने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. भारताचे पहिले पाच गडी १७ धावांतच तंबूत परतले आणि या विश्वचषक स्पर्धेतूनच गाशा गुंडाळावा लागणार, अशी चिन्हे दिसू लागली. त्याच वेळी मैदानात आला कपिल देव आणि त्याने आपल्या नाबाद १७५ धावांच्या खेळीच्या जोरावर सामना कुठच्या कुठे फिरवला. पुढे अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मग विश्वचषकही. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. दुर्दैवाने हा ऐतिहासिक सामन्याचे चित्रिकरणच होऊ शकले नाही. याचे कारण म्हणजे त्या दिवशी असलेला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा संप!!! पण आता हाच नाही, तर या स्पर्धेतील भारताचा प्रत्येक सामना मोठय़ा पडद्यावर पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. १९८३च्या भारताच्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रवासावर एक चित्रपट येऊ घातला असून त्यामुळे ही संधी रसिकांना मिळणार आहे.क्रिकेटवर याआधीही ‘अव्वल नंबर’, ‘लगान’ अशा काही चित्रपटांनी चांगला गल्ला कमावला आहे. मात्र या सर्वच चित्रपटांचा आधार काल्पनिक कथानके होती. मात्र या चित्रपटात आम्ही भारताचा विश्वचषक विजेतेपदापर्यंतचा प्रवास दाखवणार आहोत, असे संजय पुरणसिंग चौहान यांनी सांगितले. १९८३च्या विश्वचषक स्पर्धेआधी भारताला कोणीच संभाव्य विजेते मानत नव्हते. मात्र त्यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज या दिग्गजांना नमवत विश्वचषकावर आपले नाव कोरले.
हा थरार प्रत्यक्ष पडद्यावर दाखवण्यासाठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे संस्थापक-अध्यक्ष विष्णुवर्धन इंदुरी यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटात परदेशातील कलाकारांचाही मोठा वाटा असल्याने एका आंतरराष्ट्रीय कास्टिंग कंपनीला कलाकार शोधण्यासाठी नेमण्यात आले आहे. चित्रपटाची संहिता पूर्णपणे तयार असून पुढील काम सुरू आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे स्पर्धेदरम्यान खेळवल्या गेलेल्या मैदानांवरच चित्रपटातील सर्व सामन्यांचे चित्रिकरण होणार आहे. ज्या स्पर्धेनंतर भारतात क्रिकेट या खेळाला बाळसे चढले, त्या स्पर्धेत भारताने विजेतेपद कसे पटकावले, हे मोठय़ा पडद्यावर बघणे नक्कीच मनोरंजक असेल.