20 September 2020

News Flash

‘हिम्मतवाल्या’ बिनडोक प्रेक्षकांसाठी..

हल्ली बॉलीवूड म्हणत असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ढोबळ पद्धतीने मसालापटांची संख्या भरपूर असतेच; परंतु आजच्या काळाला अनुसरून त्यात अनेक नवीन नवीन फॉम्र्युले शोधत मसालापट प्रदर्शित

| March 31, 2013 12:02 pm

हल्ली बॉलीवूड म्हणत असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ढोबळ पद्धतीने मसालापटांची संख्या भरपूर असतेच; परंतु आजच्या काळाला अनुसरून त्यात अनेक नवीन नवीन फॉम्र्युले शोधत मसालापट प्रदर्शित केले जातात. मध्यंतरी नव्या धाटणीच्या सिनेमांमध्ये आलेला जुन्या फॉम्र्युलाचा ‘सिंघम’ प्रचंड यशस्वी ठरला होता. मारधाड निर्हेतूक असेल, निर्हेतूक मनोरंजन असेल तरी ते प्रेक्षकांना आवडेलच असा हेका धरून बनविले जाणारे चित्रपट आपटी खातात.  १९८३ सालचा तद्दन गल्लाभरू फॉम्र्युलाचा ‘हिम्मतवाला’ हा जितेंद्र-श्रीदेवीचा सुपरहिट ठरलेला चित्रपट नव्याने बनविताना दिग्दर्शकाने भरपूर रेट्रो पद्धतीची गाणी, अजय देवगणसारख्या सुपरहिट हीरोची चलती असल्यामुळे त्याने केलेली मारामारी या जोरावर प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरू शकेल.  परंतु नावीन्याचा अभाव, १९८३ च्या काळातील सिनेमा पाहतोय असेच वाटत राहते. खोटय़ा सिनेमाचा उत्तम नमुना असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी ‘हिम्मतवाल्या’ प्रेक्षकांनाच धाडस करावे लागेल.
प्रचंड मेलोड्रामा, मध्येच दोन-तीन रेट्रो गाणी आणि अखंड हाणामारी हा यशाचा पठडीबाज फॉम्र्युला घेऊनच चित्रपट बनवायला हवा आणि गल्ला भरून घ्यायला हवा या एकाच निस्सीम उद्देशाने निर्माते-दिग्दर्शक यांनी ‘हिम्मतवाला’ची निर्मिती केली आहे.
जुना गाजलेला याच नावाचा चित्रपट हाच मुळात दाक्षिणात्य चित्रपटाची हुबेहूब नक्कल होती. त्यामुळे त्यात नावीन्य असणे अत्यंत आवश्यक होते; परंतु परेश रावलच्या तोंडी असलेले संवाद वगळता नावीन्याचा पुरता अभाव असल्यामुळे दिग्दर्शकाच्या अतिसरधोपट कल्पनाशक्तीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. नाही म्हणायला लोकप्रिय ठरलेली गाणी पाहण्या-ऐकण्यासाठी चित्रपटगृहात जाणाऱ्या काही प्रेक्षकांना मात्र भरपूर गाणी असल्यामुळे चित्रपट आवडू शकेल.
रवी (अजय देवगण) आपल्या गावी परत येतो आणि गावातील सर्वात प्रभावी, शक्तिमान वगैरे शेरसिंगशी लढतो आणि आपल्या आई-बहिणीला गावात आपले स्थान पुन्हा मिळवून देतो. त्याचबरोबर शेरसिंग (महेश मांजरेकर)कडे गावकऱ्यांच्या जमिनींची कागदपत्रे असतात ती गावकऱ्यांना परत मिळवून देतो. मग या कथानकाच्या अनुषंगाने थोडा फ्लॅशबॅक, मग शेरसिंगसोबत लढा, शेरसिंगचा उटपटांग मेव्हणा नारायणदास (परेश रावल) याला नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत अखेर आपला नायक रवी यशस्वी ठरतो.
अजय देवगणची स्टाइलबाज मारामारी हाही विनाकारण मारामारीचे चित्रपट आवडतात असे म्हणणाऱ्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडू शकेल.  परंतु सर्वसाधारणपणे ‘आजचा प्रेक्षक’ या गटातील किमान तर्कसुसंगत कथा-पटकथा, मोजकेच पण प्रभावी संवाद आणि प्रासंगिक विनोदांची पखरण, कथेच्या अनुषंगाने येणारी मारामारी असा मसाला आवडतो. परंतु इथे त्याचाही अभाव आहेच. अर्थात चित्रपट म्हणजे बिनडोक मनोरंजनच अशी ठाम धारणा असलेल्या दिग्दर्शकाकडून फारशी अपेक्षा ठेवणेही चूकच ठरते. हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाचे वय बारा मानले जात असे. या वर्षी तसेच यापूर्वी सुरू झालेल्या नव्या ट्रेण्डनुसार हे वय वाढले असेलही; परंतु हिंदी सिनेमा आहे ना, हां, मग बारा हेच प्रेक्षकाचे वय सर्वानी धरले पाहिजे. आणि त्यानुसार आम्ही चित्रपट बनविणार, लोक तो पाहणार आणि आम्हाला गल्लापेटीवर यश मिळवून देणार. कुणी उगाच बौद्धिक मनोरंजन, तर्कसुसंगतपणा, किमान मनोरंजन वगैरे असल्या बाष्कळ संकल्पनांच्या गमजा मारू नयेत किंवा तुम्ही अशा गमजा मारत बसा, आम्हाला फिकीर नाही, अशी जणू दिग्दर्शक-निर्मात्यांची धारणा असल्यामुळे अशा चित्रपटाबद्दल अधिक काही न बोलणेच बरे.
हिम्मतवाला
निर्माते – वासु भगनानी, सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शक – साजिद खान , पटकथा-संवाद – साजिद-फरहाद, साजिद खान , संगीत – साजिद-वाजिद , कलावंत – अजय देवगण, तमन्ना भाटिया, महेश मांजरेकर, परेश रावल, रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा, झरिना वहाब, लीना जुमानी, अध्ययन सुमन, धीर चरण श्रीवास्तव, अमृता खानविलकर व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 12:02 pm

Web Title: movie review himmatwala
Next Stories
1 नात्यांचा गडबडगुंडा दर्शविणारा ‘संशयकल्लोळ’ शुक्रवारी येतोय
2 ‘राजभाषा’ चित्रपटात ‘स्पेशल २१’
3 ‘गुमराह’ – कलाकृती ५० वर्षांपूर्वीची, विषयाची अस्वस्थता आजच्या काळाचीही
Just Now!
X