पालिकेच्या घरकुल योजनेत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. केवळ अनियमिततेमुळे आमदार सुरेश जैन यांना तुरुंगात जावे लागले, अशी पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदाराची बाजू घेऊन राष्ट्रवादीचे खा. ईश्वरलाल जैन यांनी आगामी राजकारण कसे वळण घेऊ शकते, याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे सुरेश जैन हे तुरुंगात असल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याची राष्ट्रवाादीला नामी संधी असल्याचे बोलले जात असताना खा. जैन यांनी मात्र स्वपक्षाऐवजी सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीलाच स्पष्ट बहुमत मिळू शकेल, असा दावा केल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

महापालिकेच्या जाणता राजा ज्ञान व बालसाधना केंद्रातील अत्याधुनिक व्यायामशाळेच्या उद्घाटन सोहळ्यात खा. जैन हे बोलत होते. सुरेश जैन यांचे जाहीरपणे समर्थन करण्याची खा. जैन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी सुरेश जैन यांची बाजू घेतलेली आहे. खा. जैन यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अडचणीत येऊ शकते असे पक्षातील इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापौर किशोर पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खा. जैन यांनी जळगावमधील गरिबांना हक्काचे घर मिळावे व शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, या भूमिकेतूनच सुरेश जैन यांनी नियम बाजूला सारून घरकुल योजना राबविल्याचे नमूद केले. या योजनेमुळे झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळाल्याचाही त्यांनी दावा केला. घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातो. त्यातूनच सुरेश जैन यांच्यावर आज तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. शहराचा सुंदर ‘मास्टर प्लान’ साकारणारा नेता या शब्दांत खासदारांनी सुरेश जैन यांचे कौतुक केले. पुढील निवडणुकीत जनताच त्यांना त्यांच्या कामाची पावती देईल. जळगाव महापालिका निवडणुकीत आमदारांच्या नेतृत्वातील आघाडीला ७५ पैकी ५० जागांवर यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या पक्षाचा नेता विरोधी पक्षाच्या आमदाराचे गुणगान गात असल्याचे पाहून राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. खासदार पुत्र मनीष जैन यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यात सुरेश जैन यांचा मोठा वाटा असताना खा. जैन हे मात्र आपला त्या निवडणुकीशी संबंध नसल्याचे वारंवार सांगत होते. परंतु त्या निवडणुकीपासूनच खासदार आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर पडत गेले. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तर आपले सुरेश जैन यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे जाहीरपणे दाखविणे त्यांनी सुरू केले आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक असून त्यापैकी निम्मे खासदार गटाचे म्हटले जातात. या नगरसेवकांनी पक्षाचे उमेदवारी अर्ज नेले नसल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.