शहरातील क्रीडाप्रेमींना ‘मिस्टर इंडिया’ प्रशांत साळुंखे, ‘मिस इंडिया’ करूणा आणि बाल शरीरसौष्ठवपटू उमर शेख यांच्या शरीरसौष्ठवाचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी १५ मे रोजी येथे आयोजित ४१ व्या वरीष्ठ आणि नवव्या ‘फिजिकली चँलेंज नाशिक श्री’ स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.
नाशिक बॉडीबिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन तसेच सर्वप्रथम डेव्हलपर प्रा. लि. चे संचालक आनंद खट्टर, विकास गुप्ता, बी. एस. लोहिया आणि राजेंद्र सातपूरकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता गोंदे दुमाल्याजवळ महामार्गालगत असलेल्या आनंदवन टाऊनशिप येथे स्पर्धा रंगणार आहे. एकूण सहा गटात होणाऱ्या या स्पर्धेतील गटवार पहिल्या सहा क्रमांकासाठी अनुक्रमे तीन हजार, अडीच हजार, दोन हजार, दीड हजार, एक हजार, पाचशे असे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ठ प्रदर्शनासाठी तीन हजार व चषक, उत्कृष्ठ प्रगतशील शरीरसौष्ठवपटूसाटी दोन हजार व चषक आणि ‘नाशिक श्री’ चा मान मिळविणाऱ्यास २१ हजार रूपये व चषक तसेच ‘फिजिकल चॅलेंज नाशिक श्री’ विजेत्यास एक हजार रूपये व चषक, उपविजेत्यास ७५०, तिसऱ्या क्रमांकासाठी ५०० रूपये देवून गौरविण्यात येणार आहे. सातही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागपत्र आणि विजयी स्पर्धकांना प्रोटीनयुक्त खाद्य आणि व्यायामासाठी लागणारे साहित्य देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत, अशिया व भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे, स्थानिक खासदार,आमदार, महापौर आदी उपस्थित राहणार आहेत.
 जिल्ह्य़ातील सर्व क्रीडाप्रेमींनी स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन सातपूरकर, खट्टर, लोहिया यांनी केले आहे.